महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पालघर: पालक सचिवांनी घेतला पाणी टंचाई आढावा, विविध उपाययोजनांसह सवलती केल्या लागू

आवश्यकतेनुसार टँकरची संख्या वाढविण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात आले आहेत, अशी माहिती आदिवासी विकास विभागाच्या प्रधान सचिव तथा पालघर जिल्ह्याच्या पालक सचिव मनीषा वर्मा यांनी दिली.

By

Published : May 18, 2019, 10:50 AM IST

Updated : May 18, 2019, 11:41 AM IST

पालघर: पालक सचिवांनी घेतला पाणी टंचाई  आढावा, विविध उपाययोजनांसह सवलती केल्या लागू

पालघर (वाडा)- जिल्ह्यातील दुष्काळ जाहीर झालेल्या गावांमध्ये गरजेनुसार टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात येत असून शासनाने जाहीर केलेल्या सवलती लागू करण्यात आल्या आहेत. तर आवश्यकतेनुसार टँकरची संख्या वाढविण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात आले आहेत, अशी माहिती आदिवासी विकास विभागाच्या प्रधान सचिव तथा पालघर जिल्ह्याच्या पालक सचिव मनीषा वर्मा यांनी दिली.

पाणी टंचाई आणि उपाययोजनाबाबत जव्हार येथील बायफ संस्था हॉलमध्ये पत्रकार परिषद घेण्यात आली, यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी वन पट्टे वाटप झालेल्या लाभार्थ्यांना योजनांचा लाभ प्राधान्याने देण्यात यावा, असे निर्देशही त्यांनी दिले. सवलतींमध्ये वीजबिलात सुट, चारा छावण्या, महसुलात सुट, विद्यार्थी परीक्षा शुल्कात माफी, आदी सवलतीही यावेळी जाहीर करण्यात आल्या.

पालघर: पालक सचिवांनी घेतला पाणी टंचाई आढावा, विविध उपाययोजनांसह सवलती केल्या लागू

जिल्ह्यातील पालघर, विक्रमगड आणि तलासरी तालुक्यात पहिल्या टप्प्यात दुष्काळ जाहीर केला आहे. तर दुसऱ्या टप्प्यात जव्हार, मोखाडा आणि वसई तालुक्यातील 35 गावांमध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती घोषित केली आहे. जव्हार येथे टंचाई आढावा बैठकीपुर्वी जव्हार तालुक्यातील कासटवाडी व वाळवंडा येथे 17 मे 2019 ला पालक सचिव वर्मा यांनी वाळवंडा गावातील बंधाऱ्यातील गाळ काढण्याच्या कामाची प्रत्यक्ष पाहणी केली. या कामावर 330 मजूर उपस्थित असून या कामाचा अंदाजित खर्च 13 लाख 85 हजार रुपये आहे. वर्मा यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून कामाची माहिती करून घेतली तसेच वळवंडाच्या सरपंच गुलाब विष्णू वैजल यांच्याशीही संवाद साधला. त्यांनी जव्हार तालुक्यातील कासटवाडी येथील टँकरने पाणीपुरवठा केला जाणाऱ्या विहिरीची पाहणी करुन ग्रामस्थांशी संवाद साधला.

टंचाई कृती आराखडा-

ऑक्टोबर 2018 ते जून 2019 या कालावधीतील टंचाई कृती आराखड्यामध्ये पालघर तालुक्यातील 40 गावे आणि 90 पाडे, वसई तालुक्यातील 35 गावे आणि 23 पाडे, डहाणू तालुक्यातील 87 पाडे, तलासरी तालुक्यातील 30 पाडे, वाडा तालुक्यातील 35 गावे आणि 106 पाडे, विक्रमगड तालुक्यातील 13 गावे आणि 131 पाडे, जव्हार तालुक्यातील 30 गावे आणि 52 पाडे तर मोखाडा तालुक्यातील 43 गावे आणि 64 पाडे अशा एकूण 196 गावे आणि 583 पाड्यांमध्ये 779 विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. यासाठी 875.15 लाख रूपये इतका खर्च अपेक्षित आहे.

30 जून पर्यंत पाणी टंचाई भासणाऱ्या संभाव्य गाव/पाड्यांची संख्या 779 इतकी असून यामध्ये विहीर अधिग्रहण, टँकरद्वारे पाणी पुरवठा, नळ पाणी पुरवठा योजना विशेष दुरूस्ती करणे, नवीन विंधन विहिरी घेणे, तात्पुरती पुरक नळपाणी पुरवठा योजना करणे, अशा उपाययोजनांचा समावेश आहे.

वीजबिलांमध्ये सवलत-

पालघर व तलासरी तालुक्यांमधील एकूण 5 हजार 943 ग्राहकांना फेब्रुवारी 2019 च्या वीज बिलाद्वारे एकूण रूपये 24 लाख 44 हजार 364 ची सूट देण्यात आली आहे. तर पालघर, तलासरी व विक्रमगड तालुक्यांमध्ये शेती पंप ग्राहकांच्या वीज जोडण्या खंडित करण्यात आल्या नाहीत.

दुष्काळ अनुदान वाटप-

पालघर तालुक्यात 205 गावांमधील याद्या तयार झालेल्या 30 हजार 128 शेतकऱ्यांच्या बँक खात्यात खरीप 2018 हंगामातील दुष्काळ अनुदान वाटपाची मदत जमा करण्यात आली असून मंजूर अनुदानाच्या तुलनेत हे प्रमाण 98.72 टक्के इतके आहे. विक्रमगड तालुक्यात 86 गावांतील 14 हजार 752 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये मदत जमा झाली असून त्याचे प्रमाण 80.90 टक्के आहे. तर तलासरी तालुक्यात 42 गावांमध्ये 6 हजार 294 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये मदत जमा झाली त्याचे प्रमाण मंजूर अनुदानाच्या तुलनेत 75.30 टक्के असे आहे. जिल्ह्यात याद्या तयार करण्यात आलेल्या एकूण 333 गावांमध्ये 51 हजाप 174 शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये 21 कोटी 09 लाख, 59 हजार 180 रूपयांचा निधी बँक खात्यात जमा करण्यात आला आहे. ही टक्केवारी प्राप्त अनुदानाच्या 88.53 टक्के इतकी आहे.

तसेच जिल्ह्यात एकूण 212 शाळांमधील इ. 10 वी च्या 12 हजार 958 विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क तर 82 शाळांमधील इ. 12 वी च्या 9 हजार 971 विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क प्रतिपूर्तीसाठी पात्र ठरवण्यात आले आहेत.

जमीन महसुलामध्ये सूट-

जिल्ह्यातील पालघर, विक्रमगड, तलासरी, वसई, जव्हार आणि मोखाडा या सहा तालुक्यांमधील 543 गावांमध्ये 95 हजार 750 खातेदारांच्या 21.49 लाख इतक्या जमीन महसुलामध्ये सूट देण्यात आली आहे.

Last Updated : May 18, 2019, 11:41 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details