नाशिक- दिंडोरी तालुक्यात द्राक्षशेतीचा जोड धंदा असणाऱ्या बेदाणे करण्याचे प्रमाणही मोठ्या प्रमाणात आहे. पण, कोरोनामुळे बाजार, मजूर काहीच उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांना याचा मोठा आर्थिक फटका बसत आहेत.
दिंडोरी तालुक्यातील पालखेड बंधारा येथे गेल्या अनेक वर्षांपासून बेदाणे करण्याचे काम शेतकरी दीपक गायकवाड व संतोष गायकवाड हे करतात. सध्या या शेतकऱ्यांना कोरोनामुळे निर्यात बंदीचा फटका बसत असल्याने त्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
साधारणतः जानेवारी-फेब्रुवारी मध्येच शेतकरी लाखो रुपये खर्च करून बेदाण्यासाठी शेडची उभारणी करतात. त्यांनतर तालुक्यातील अनेक ठिकाणी शेतकऱ्यांकडे जाऊन हिरवे व काळे द्राक्ष विकत घेऊन त्यावर प्रक्रिया करून हा बेदाणे तयार करतात. बेदाणे तयार करण्यासाठी मजुरांनाही रोजगार उपलब्ध होतो. यासाठी बँक, सोसायटी यांच्याकडून कर्ज घेऊन शेतकरी हा माल खरेदी करतात. मात्र, गेल्या काही दिवसांपासून दिंडोरी तालुक्यात अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने बेदाण्याचे नुकसान झाले आहे. त्यातच कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाकडून विविध उपाययोजना केल्या जात असल्याने संचारबंदी, निर्यातबंदीचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे.