महाराष्ट्र

maharashtra

By

Published : May 31, 2021, 7:14 PM IST

ETV Bharat / state

ग्रामीण भागात पुन्हा पळसाच्या पत्रावळीवर घेतला जातोय जेवणाचा आस्वाद

कोरोना आणि लॉकडाऊनमुळे प्लॅस्टिकच्या पत्रावळ्या आणि द्रोणची टंचाई निर्माण झाली आहे. ग्रामीण भागात पुन्हा एकदा पळसाच्या पानापासून पत्रावळ्या बनविण्याकडे लोकांचा कल वाढला आहे. विवाह सोहळ्यासह विविध कार्यक्रमात जेवणासाठी या पत्रावळ्याचा वापर आता पुन्हा वाढला आहे.

विशेष बातमी
विशेष बातमी

नांदेड - कोरोना आणि लॉकडाऊनमुळे प्लॅस्टिकच्या पत्रावळ्या आणि द्रोणची टंचाई निर्माण झाली आहे. ग्रामीण भागात पुन्हा एकदा पळसाच्या पानापासून पत्रावळ्या बनविण्याकडे लोकांचा कल वाढला आहे. विवाह सोहळ्यासह विविध कार्यक्रमात जेवणासाठी या पत्रावळ्याचा वापर आता पुन्हा वाढला आहे. पारंपरिक पद्धतीने पत्रावळ्या आणि द्रोण तयार करण्यासाठी घरातील सदस्य पुढाकार घेत असून कोरोनाच्या काळातील ही एक चांगली शिकवण पुन्हा रूढ होत असल्याची भावना व्यक्त केली जात आहे. प्लॅस्टिकच्या साहित्यामुळे आजार पसरण्याची भीती आहे. त्यामुळे सगळेच लोक आता या पळसाच्या पानांपासून बनवलेल्या साहित्याला प्राधान्य देत आहे. यामुळे ग्रामीण भागात कारागिरांच्या हातालाही काम मिळणार आहे.

ग्रामीण भागात पुन्हा पळसाच्या पत्रावळीवर घेतला जातोय जेवणाचा आस्वाद

पत्रावळ अशी बनविली जाते
पत्रावळ म्हणजे पळसाच्या पानांची गोलाकार थाळी किंवा ताट होय. ती मुख्यत: भोजनासाठी उपयोगात आणली जाते. पत्रावळी लग्नसमारंभात किंवा अन्य कार्यक्रमात जेवणावळींसाठी वापरल्या जात. त्याआधीच्या काळात घरोघरी बनवल्या जात होत्या. नारळाच्या किंवा लिंबाच्या झाडापासून काढलेल्या काड्यांनी त्या जोडल्या जातात. तसे जोडून साधी पसरट पत्रावळ तयार केली जाते. कालांतराने जेवणाचे इतर पदार्थ पत्रावळीमध्ये व्यवस्थित वाढता यावे, म्हणून त्यात वाट्या तयार करण्यात येऊ लागल्या.

अलीकडच्या काळात प्लास्टिक पत्रावळीचा वापर वाढला
पानांचा वापर करून तयार केलेल्या पत्रावळी तुटतात, फाटतात किंवा त्यांना वाळवी लागते म्हणून हल्ली थर्माकोलने तयार केलेल्या पत्रावळी बाजारात आल्या आहेत. पत्रावळी बनवून विकण्याचा व्यवसाय अनेक कुटुंबे करत होते. त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नावर उदरनिर्वाह करत होते. पत्रावळी बनवून थेट शहरातील बाजारात विकल्या जात होत्या. त्यामुळे अनेक कुटुंबांना रोजगार मिळत असे. आता यंत्राद्वारे प्लॅस्टिकच्या पत्रावळी व द्रोण अत्यंत कमी वेळात, कमी किमतीत, तसेच विविध रंगांत उपलब्ध होतात. पण त्या पर्यावरणास हानिकारक असतात. त्याला पर्याय म्हणून कागदाच्या पत्रावळी बाजारात आल्या आहेत. त्या पत्रावळींना अ‍ॅल्युमिनिअमचे कव्हर लावले जाते. त्यामुळे त्यात जेवणाचे पदार्थ वाढता येतात. पण कार्यक्रम संपल्यानंतर पत्रावळी कचऱ्यात टाकून दिल्या जातात. शहरात जनावरांचे प्रमाण कमी असल्याने पानाच्या पत्रावळींपेक्षा कागदाच्या पत्रावळींचा वापर मोठ्या प्रमाणात होतो. शहरात कार्यक्रमात जेवणावळींसाठी बफे व केटरिंग पद्धत वाढली आहे. जेवणाच्या पंगतीत पळसाच्या पानाच्या पत्रावळीवर जेवण्याची चव वेगळीच होती. आता फास्ट फूड संस्कृतीमुळे कागदी पत्रावळ्या आल्या आणि पत्रावळीवर मिळणारा येळून काढलेला स्वादाचा भात आणि शेक कालबाह्य झाले आहे. पत्रावळ्या पहावयास मिळत आहेत. मात्र त्या पंगतीतून हद्दपार झाल्या आहेत.

ती चवच भारी!

आता कागदी-प्लॅस्टिक पत्रावळीवर पंगती झडू लागल्या आहे. पण पळसाच्या पानाची द्रोण-पत्रावळी नसल्यामुळे कागदी पत्रावळीवर पाच पक्वान असूनही त्याची चव आणि स्वाद घेता येत नाही. पळसाच्या पानावरील पत्रावळीवर वाढलेला येळलेला भात आणि भाताच्या उंड्याची टाळू फोडून त्यावर द्रोणा शिवाय वाढलेली शेक तृप्त जेवण झाल्याची खून असायची. त्या चवीची सर आजही कशाला येत नाही.

पुन्हा एकदा कल वाढतोय
पुरातन काळात पत्रावळीवर जेवण करणे हे प्रशस्त मानले गेले आहे. पत्रावळीसाठी सहसा पळसाची पाने वापरली जातात. पळसाच्या पानांमध्ये आयुर्वेदिक गुणधर्म असल्याने अन्नपचन होण्यास मदत होते. पळसाच्या पत्रावळी शिवण्यासाठी लिंबाच्या काडीचा वापर केला जातो. लिंबाच्या झाडालाही आयुर्वेदात महत्त्व आहे. पानांनी बनवलेल्या पत्रावळींचा वापर गावाकडे जनावरांना खायला देण्यात होतो. त्यामुळे कचरा तयार होणे आणि त्याची विल्हेवाट लावण्याचा प्रश्न उद्भवत नाही. त्यामुळे या पत्रावळ्या पर्यावरण पूरक आणि शरीरासाठीही हानिकारक नाहीत. कोरोनाच्या काळात पुन्हा एकदा आरोग्याचे महत्व लक्ष्यात घेऊन या पत्रावळीकडे ग्राहकांचा कल वाढल्याचे चित्र ग्रामीण भागात वाढल्याचे दिसून येत आहे.

हेही वाचा- औरंगाबाद : पोलीस ठाण्यातील तोडफोडप्रकरणी आमदार प्रदीप जैस्वाल यांना सहा महिन्यांची शिक्षा

ABOUT THE AUTHOR

...view details