महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अचूक खड्डे मोजा अन् ५ हजार बक्षीस मिळवा; नांदेडमध्ये अनोखी स्पर्धा..!

नांदेडमध्ये मध्यवर्ती बसस्थानक ते जुना पूल रस्त्यावरील खड्डे मोजण्याची अनोखी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. योग्य आणि अजूक खड्डे मोजणाऱ्याला ५ हजार रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे.

By

Published : Nov 4, 2019, 2:48 PM IST

नांदेडमध्ये अचूक खड्डे मोजण्याच्या स्पर्धेचे आयोजन

नांदेड - मध्यवर्ती बसस्थानक ते जुना पूल हा रस्ता खड्ड्यात आहे, की रस्त्यात खड्डे आहेत, असा प्रश्न नागरिकांनापडला आहे. या रस्त्यावर एकूण किती खड्डे आहेत? सर्वात मोठा खड्डा कोणता आहे? हे अचूक सांगणाऱ्या नागरिकाला ५ हजार रुपयांचे बक्षीस देण्यात येणार आहे. या अनोख्या स्पर्धेमध्ये जास्तीत जास्त नागरिकांनी भाग घ्यावा, असे आवाहन धर्मभूषण अ‍ॅड. दिलीप ठाकूर यांनी केले आहे.

नांदेड हे ऐतिहासिक शहर आहे. या शहराला धार्मिक दृष्टया देखील मोठे महत्त्व आहे. शहरात आगमन झाल्यानंतर जुना पूल ते देगलूर नाका, बाफना, हिंगोली गेट, रेल्वे स्टेशन मार्गे बस स्थानकावर यावे लागते. या रस्त्यावर शेकडो खड्डे पडलेले आहेत. वारंवार मागणी करून देखील हा रस्ता दुरुस्त करण्यात येत नाही. मलम पट्टी करून रस्त्याची डागडूजी करण्यात येते. मात्र, ही डागडूजी फार काळ टिकत नाही. वारंवार तयार होणाऱ्या खड्ड्यांमुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहेत. या समस्येकडे मनपा प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी शहरवासीयांना खड्डे मोजण्याच्या कामात योगदान देण्याच्या दृष्टीने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. एक आठवडा ही स्पर्धा चालणार असून इच्छुकांनी खड्डे मोजतानाचा आपला फोटो व्हाट्सअॅपवर टाकायचा आहे. रविवार दि. १० नोव्हेंबरपर्यंत व्हाट्सअॅप क्रमांक ९४२१८३९३३३ वर नागरिकांनी बस स्थानक ते देगलूर नाका मार्गे जुना पुल दरम्यान खड्ड्यांची संख्या किती आहे. सर्वात मोठा खड्डा कुठे आहे? हे लिहून पाठवायचे आहे. सर्वात अचूक उत्तर देणाऱ्या जागरुक नागरिकाला ५ हजार रुपयांचे बक्षीस देऊन १२ नोव्हेंबरच्या गोदावरी गंगा पूजनाच्या कार्यक्रमात गौरव करण्यात येणार आहे. तरी जास्तीत जास्त नागरिकांनी या अभिनव स्पर्धेत सहभाग घ्यावा, असे आवाहन संयोजक अॅड. दिलीप ठाकूर यांनी केले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details