महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Apr 5, 2021, 1:12 PM IST

ETV Bharat / state

'क्राईम कॅपिटल'नंतर नागपूर ठरले 'कोरोना कॅपिटल', लोकसंख्येच्या तुलनेत भारतात सर्वाधिक रूग्ण

गेल्या वर्षभरापासून राज्यात कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. शासन, प्रशासन आणि आरोग्य विभागाने अथक प्रयत्न करून कोरोना आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला होता. त्यात त्यांना यशही आले होते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून पुन्हा कोरोना रूग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. यामुळे आरोग्य यंत्रणांवरील ताण पुन्हा वाढला आहे. नागपूरमध्ये एकूण लोकसंख्येच्या तुलनेत सध्या कोरोना रूग्णांची संख्या जास्त असल्याचे समोर आले आहे.

Nagpur corona patients and population ratio
नागपूर कोरोनाबाधित लोकसंख्या बातमी

नागपूर - देशात पुन्हा एकदा कोरोना विषाणूंची जीवघेणी दहशत निर्माण होऊ लागली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे. देशातील इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोनाबाधित रूग्ण असल्याचे आकडे पुढे आले आहेत. उपराजधानी नागपुरात देखील अतिशय भीषण परिस्थिती उद्भवली आहे. राज्यात आणि देशात सर्वाधिक अ‌ॅक्टिव रूग्ण पुण्यात आहेत मात्र, लोकसंख्येच्या तुलनेत सर्वाधिक कोरोनाबाधित रूग्ण हे नागपूरमध्ये असल्याचा निष्कर्ष समोर आला आहे. महाराष्ट्राची राजधानी मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती या महानगरांमध्ये सुद्धा कोरोना बळावला आहे मात्र, नागपूरला सर्वाधिक धोका असल्याचे तज्ञांचे मत आहे.

नागपूरमधील कोरोना परिस्थितीबाबत डॉ. अविनाश बानाईत यांनी माहिती दिली

राज्यात कोरोनाची दुसरी लाट अधिकच जीवघेणी ठरत आहे. महाराष्ट्रातील कोरोना रूग्णांची संख्या आणि मृत्यूचे आकडे दिवसेंदिवस वाढत आहेत. एका अहवालानुसार सध्या सर्वाधिक रूग्ण वाढत असलेल्या देशातील दहा शहरांमध्ये सर्वाधिक शहरे महाराष्ट्रातील आहेत. त्यामध्ये मुंबई, पुणे, नागपूर समावेश आहे.

लोकसंख्येच्या तुलनेत नागपूरचा देशात पहिला क्रमांक -

कोरोनामुळे बाधित होणाऱ्या रूग्णांची संख्या आणि रोज होणारे मृत्यू या दोन्ही बाबतीत नागपूरने आघाडी घेतली आहे. प्रशासनाच्या चुकीच्या नियोजनामुळे नागपूरमध्ये कोरोनाच्या उद्रेक होत असल्याचा निष्कर्ष काही तज्ज्ञांनी काढला आहे. सध्या नागपूर जिल्ह्यात ४१ हजार अ‌ॅक्टिव कोरोनाबाधित आहेत. नागपूर जिल्ह्याची लोकसंख्या (अंदाजे) ५० लाखांच्या घरात आहे. नागपुरची लोकसंख्या ही राज्याच्या एकूण लोकसंख्येच्या सरासरी ५ टक्के इतकी आहे. नागपूर जिल्ह्यात दरदिवशी कोरोनाने बाधित होणाऱ्या रुग्णांची संख्या सरासरी ३ हजार ५०० ते ४ हजार इतकी आहे. याचाच अर्थ असा होती की, नागपूर शहरात कोरोना विषाणूचा उद्रेक झालेला आहे. नागपूरमध्ये दर २४ तासात सरासरी ५० कोरोना रूग्णांच्या मृत्यूची नोंद होत आहे. याउलट पुणे शहराची लोकसंख्या (अंदाजे) १ कोटी इतकी आहे. सध्या पुण्यात ८१ हजार अ‌ॅक्टिव कोरोनाबाधित रूग्ण आहेत. पुण्यात सरासरी सहा ते सात हजार रूग्ण बाधित होत असून दररोज ४० रुग्णांचा मृत्यू होतो. नागपूरमध्ये लोकसंख्येच्या अनुपातात संक्रमण दर हा जवळ-जवळ १ टक्क्यावर आहे. तर, पुण्याचा संक्रमण दर हा ०.९० टक्के इतका आहे.

राज्याची राजधानी मुंबईची परिस्थिती देखील आता वाईट होण्यास सुरुवात झाली आहे. मुंबई आणि उपनगरांची लोकसंख्या साधारणतः सव्वा दोन कोटी इतकी आहे. सध्या मुंबई आणि उपनगरांमध्ये ६६ हजार कोरोनाबाधित रूग्ण उपचार घेत आहेत. ठाण्याचा संक्रमण दर हा ०.३५ टक्के इतका आहे. याशिवाय औरंगाबाद जिल्ह्याचा विचार केल्यास सध्या औरंगाबाद येथे १६ हजार ५४ अ‌ॅक्टिव रूग्ण आहेत. औरंगाबादचा संक्रमण दर हा ०.४५ टक्के इतका आहे. याचाच अर्थ असा होती की महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर हे कोरोना संक्रमणाच्या बाबतीत देशाची राजधानी ठरत आहे.

प्रशासनाने नियोजन चुकले - डॉ. बानाईत

नागपूर जिल्ह्यात कोरोना रूग्णांची संख्या वाढू लागली तेव्हा नागरिकांपेक्षा प्रशासनचं जास्त घाबरलेल्या अवस्थेत असल्याचे दिसून आले. रोज नविन नियम लावून लोकांच्या मनात गोंधळ उडवण्याचे काम प्रशासनाने केले. केवळ १ वाजेपर्यंत दुकाने सुरू ठेवण्याच्या निर्णयामुळे दुकानांमध्ये लोकांची गर्दी होऊ लागली होती. ज्यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढण्यास हातभारच लागल्याचा अंदाज डॉ. अविनाश बानाईत यांनी व्यक्त केला.

हेही वाचा -...अन्यथा संपावर जाऊ; ससूनमधील निवासी डॉक्टरांचा इशारा

ABOUT THE AUTHOR

...view details