मुंबई - रिपब्लिकन पक्षाचे राज्य उपाध्यक्ष दीपक निकाळजे यांना पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या आदेशानुसार नुकतेच रिपाईतून निलंबित करण्यात आले होते. याचा खुलासा दीपक निकाळजे यांनी रविवारी चेंबूर येथे आयोजित पत्रकार परिषदेत केला. तसेच आठवले यांनी 2018 ला रिपब्लिकन पक्ष (आंबेडकर) गटाचा राजीनामा देऊन नवीन पक्ष रिपब्लिकन पक्ष (आठवले) स्थापन केला. त्यामुळे मी 20 वर्षांपासून रिपब्लिकन पक्षाचा (आंबेडकर) सदस्य असल्याने मला रिपब्लिकन पक्षातून काढून टाकण्याचा प्रश्न निर्माण होत नसल्याचे दीपक निकाळजे यांनी सांगितले.
आरपीआयच्या आठवले गटात गेले 20 वर्षांपासून कार्यरत असणारे व पक्षाची उपाध्यक्ष पदाची धुरा सांभाळणारे दीपक निकाळजे यांची आरपीआय(आंबेडकर) पक्षातील राष्ट्रीय कार्यकारिणीने राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून भोपाळ येथे 10 नोव्हेंबर रोजी एकमताने निवड केली आहे. आरपीआयचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी 2018 रोजी आरपीआय (आंबेडकर) पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदाचा राजीनामा देऊन आरपीआय (आठवले) नावाच्या स्वतंत्र पक्षाची 2019 मध्ये निवडणूक आयुक्तांकडे नोंदणी केली. त्यामुळे या पक्षाच्या रिक्त झालेल्या राष्ट्रीय अध्यक्ष पदाची नियुक्ती करण्याकरिता भोपाळमध्ये 10 नोव्हेंबर रोजी महासभा आयोजित करण्यात आली होती. या महासभेत 26 राज्यातील एकूण 200 पेक्षा अधिक प्रतिनिधी आले होते. यावेळी त्यांनी एकमताने राष्ट्रीय अध्यक्ष पदावर दीपक निकाळजे यांची निवड केली. आरपीआय (आंबेडकर)पक्षाची 27 जुलै 1990 रोजी भारतीय निवडणूक आयुक्त यांच्याकडे नोंदणी करण्यात आला आहे. याचे मुख्य कार्यालय भोपाळ येथे आहे. हा पक्ष देशातील 26 राज्यात कार्यरत असून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचार धारेवर चालणारा आहे.
हेही वाचा - शिवसेना एनडीएतून बाहेर, संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशींनी केले जाहीर