उर्मिला मातोंडकरांनी घेतली शरद पवारांची भेट, अर्धा तास चर्चा - mumbai
मातोंडकर राजकारणात नवख्या असल्या तरी त्यांची राजकीय भाषणे व माध्यमांसमोर केलेली वक्तव्ये पाहता, त्या मुरलेल्या राजकारण्यांसारखे बोलताना दिसत आहेत. उर्मिला मातोंडकर यांच्यासमोर आव्हान असलेले गोपाळ शेट्टी यांनी गत निवडणुकीत काँग्रेसच्या संजय निरुपम यांचा पराभव केला होता. या निवडणुकीत उर्मिला मातोंडकर त्यांना कितपत आव्हान देतात हे बघणे औत्सुक्याचे ठरेल.
मुंबई - काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या उत्तर मुंबईच्या उमेदवार व अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी कमी वेळेत प्रचारात चांगलीच झेप घेतली आहे. आपल्या मतदारसंघात त्यांनी भेटीगाठींचा जोर वाढवला असून महायुतीचे उमेदवार गोपाळ शेट्टी यांच्यासमोर त्यांनी तगडे आव्हान उभे केले आहे. दरम्यान, राजकारणात नवख्या असलेल्या मातोंडकर यांनी राजकारणाचे डावपेच जाणून घेण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांचीही आज मुंबईत भेट घेतली.
उर्मिला मातोंडकर यांची उमेदवारी काँग्रेसने जाहीर केल्यानंतर त्यांनी जोरदार प्रचाराला सुरुवात केली. त्या नवख्या असल्या तरी त्यांची राजकीय भाषणे व माध्यमांसमोर केलेली वक्तव्ये पाहता, त्या मुरलेल्या राजकारण्यांसारखे बोलताना दिसत आहेत. उर्मिला मातोंडकर यांच्यासमोर आव्हान असलेले गोपाळ शेट्टी यांनी गत निवडणुकीत काँग्रेसच्या संजय निरुपम यांचा पराभव केला होता. या निवडणुकीत उर्मिला मातोंडकर त्यांना कितपत आव्हान देतात हे बघणे औत्सुक्याचे ठरेल.
आज उर्मिला मातोंडकर यांनी शरद पवारांची भेट घेतली. राजकारणात मार्गदर्शन घेण्यासाठी त्यांनी पवारांची भेट घेतल्याचे त्या म्हणाल्या. त्यांच्या भेटीचे फोटोही त्यांनी ट्विटरवरून प्रसिध्द केले. त्यांच्यात जवळपास अर्धा तास चर्चा झाली. "गुरुतुल्य आणि उत्तुंग व्यक्तिमत्व असणारे माननीय पवार साहेब यांचे मार्गदर्शन लाभल्यावर आता हा प्रवास विजयाकडेच जाईल. माझ्या या लढ्याला बळकटी दिल्याबद्दल त्यांचे अनेक अनेक आभार" अशा शब्दात त्यांनी पवारांचे आभार मानले.