महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Mar 22, 2023, 8:53 AM IST

ETV Bharat / state

Gogawle Met Mahadeshwar: भरत गोगावले यांनी महाडेश्वरांना दिला सल्ला, म्हणाले आमच्याकडे या...सर्व आजार नॉर्मल होतील

ठाकरे गटाचे मुंबईचे माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांची मंगळवारी विधान भवनात शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांच्याशी भेट झाली. यावेळी आमच्याकडे या तुमचे शुगर, ब्लड प्रेशर सर्व आजार नॉर्मल होतील, भरत गोगावले यांचा महाडेश्वरांना सल्ला दिला. राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा शेवटचा आठवडा सुरू आहे. या संपूर्ण अधिवेशनामध्ये अनेक रोचक किस्से बघायला भेटले.

Bharat Gogawle News
भरत गोगावले यांचा महाडेश्वरांना सल्ला

मुंबई :राज्यातील राजकारणाला सध्या फारच वेगळे वळण मिळत आहे. नेहमी काहीतरी नवीन घटना या घडत असतात. मुंबईचे माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर हे मंगळवारी सायंकाळी विधानभवनात आले होते. विधान भवनात प्रवेश करताक्षणी त्यांच्यासमोर शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले हे उभे होते. भरत गोगावले यांनी त्यांना पाहता क्षणी त्यांच्याजवळ जाऊन त्यांना हात मिळविला. तेव्हा त्यांच्या लक्षात आले की, महाडेश्वर यांच्या उजव्या हातावर एक छोटी सफेद रंगाची पट्टी चिटकवली आहे.

पट्टीविषयी विचारणा :भरत गोगावले यांनी या छोट्या पट्टीविषयी विचारणा केली असता महाडेश्वर म्हणाले की, आजच मी रक्ताची चाचणी केली आहे, त्यासाठी ही पट्टी चिटकवली आहे. हे ऐकताच भरत गोगावले म्हणाले की, अहो आमच्याकडे या, तुमची शुगर, ब्लड प्रेशर सर्व काही आजारपण निघून जाईल. आम्ही बघा कसे एकदम ठणठणीत आहोत, असा उपरोधिक टोला त्यांनी विश्वनाथ महाडेश्वर यांना लगावला. हे एकूण महाडेश्वर सुद्धा जोरजोरात हसू लागले. यादरम्यान तिथे उपस्थित असलेल्या कॅमेरामननी हे दृश्य आपले कॅमेऱ्यामध्ये टिपण्याचा प्रयत्न केला असता, महाडेश्वर यांनी त्यास मनाई केली.

शिंदे गटासोबत या : शिंदे गटाच्या आमदारांची नवीन सरकारमध्ये बल्लेबल्ले सुरू आहे, तरीसुद्धा उद्धव ठाकरे यांच्यासोबत असलेल्या आमदारांना व कार्यकर्त्यांना सध्या तरी अनेक अग्निपरीक्षांना सामोरे जावे लागत आहे. अशात ही अग्नी परीक्षा नको असेल तर आमच्यासोबत या, तुमचे स्वास्थ्य म्हणजेच शुगर, प्रेशर सर्वकाही व्यवस्थित राहील असे प्रत्यक्षपणे भरत गोगावले सांगत आहेत. याचाच अर्थ शिंदे गटासोबत आल्यावर तुम्हाला कुठलाही त्रास राहणार नाही, असा होत आहे.

अर्थसंकल्पीय अधिवेशन :राज्यात शिंदे - फडवणीस सरकार अस्तित्वात आल्यानंतर पहिला अर्थसंकल्प सादर झाला. यावेळी अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधी पक्षातील नेत्यांनी अनेकदा विधानसभेच्या पायऱ्यांवर आंदोलन केल्याचे दिसून आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाकडून उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील कार्यकर्त्यांसह, नेत्यांना सुध्दा आपल्या गटात आणण्याचे प्रयत्न केले जात आहेत. शिंदे गटाचे प्रवक्ते भरत गोगावले यांच्याकडेही खास जबाबदारी देण्यात आली आहे. कुठल्याही अनुषंगाने तेउद्धव ठाकरे गटाचे आपले जुने सहकारी आपल्याकडे कसे येतील? याची ते वाटच बघत आहेत, असे दिसते.

अनेक अग्निपरीक्षांना सामना :केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करून महाविकास आघाडीतील नेत्यांवर विशेष करून उद्धव ठाकरे यांच्यासोबत असलेल्या आमदार, नेत्यांवर दबाव आणण्याचा प्रयत्न भाजप करत आहे, असा आरोप वारंवार होत आहे. उद्धव ठाकरे गटाचे कोकणातले आमदार वैभव नाईक, आमदार राजन साळवी यांची सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये केंद्रीय तपास यंत्रणांकडून चौकशी सुरू आहे. तर दुसरीकडे आपल्या मतदारसंघांमध्ये खारेपाणी येत आहे. त्या संदर्भामध्ये सुरू असलेल्या प्रकल्पाला स्थगिती देण्याचे काम या सरकारने केले आहे, असा आरोप उद्धव ठाकरे गटाचे अकोल्याचे आमदार नितीन देशमुख यांनी याच अधिवेशनामध्ये केला. ते विधानभवनाच्या प्रांगणात असलेल्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ उपोषणालाही बसले होते.


भ्रष्टाचाराचे आरोप : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्याचबरोबर महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांची अनेक भ्रष्टाचाराची प्रकरणे भाजप नेते किरीट सोमैय्या यांनी उघडकीस आणली. त्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर त्यांच्यासोबत गेलेल्या आमदारांच्या भ्रष्टाचाराची प्रकरण पूर्णपणे बंद झाली, असल्याचे बोलले जात आहे. विशेष म्हणजे ठाण्याचे आमदार प्रताप सरनाईक त्याचबरोबर मुंबई महानगर पालिकेचे स्थायी समितीचे माजी अध्यक्ष यशवंत जाधव, खासदार भावना गवळी, माजी खासदार आनंदराव अडसूळ यांच्यावर किरीट सोमय्या यांनी भ्रष्टाचाचे आरोप केले होते. परंतु शिंदे गटामध्ये प्रवेश केल्यानंतर हे आरोप बाजूला सारले गेले.

हेही वाचा : Eknath Khadse attack on BJP : राज्यात आता 'नमो चहा विक्रेता महामंडळ' स्थापन करा; एकनाथ खडसेंचा भाजपला खोचक टोला

ABOUT THE AUTHOR

...view details