महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

बारावी पुरवणी परीक्षेचा निकाल फक्त २३.१७ टक्के!

बारावीच्या परिक्षेला बसलेल्या १ लाख ३१ हजार ३५५ विद्यार्थ्यांपैकी केवळ ३० हजार ४३८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून एकूण निकाल फक्त २३.१७ टक्के लागला आहे.

By

Published : Aug 23, 2019, 1:43 PM IST

Updated : Aug 23, 2019, 1:49 PM IST

बारावी पुरवणी परीक्षेचा निकाल फक्त २३.१७ टक्के!

मुंबई -महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून १७ जुलै ते ३ ऑगस्ट दरम्यान राज्यभरात बारावीची पुरवणी परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेचा निकाल जाहीर झाला. परीक्षेला बसलेल्या १ लाख ३१ हजार ३५५ विद्यार्थ्यांपैकी केवळ ३० हजार ४३८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून एकूण निकाल फक्त २३.१७ टक्के लागला आहे. तसेच ज्यांना गुणांची पडताळणी करायची आहे, त्यांना २६ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर दरम्यान मंडळाकडे अर्ज करता येणार आहे.

आज (शुक्रवारी) दुपारी एक वाजता राज्य शिक्षण मंडळाच्या www.maharesult.nic.in या संकेतस्थळावर जाहीर झाला. परीक्षेला बसलेल्या एकूण विद्यार्थ्यांपैकी तब्बल १ लाख ९१७ विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत. ही बाब मोठी गंभीर असून विद्यार्थ्यांनी तात्काळ दिलेली संधीसुद्धा गमावली आहे. शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या ९ विभागीय मंडळांतर्फे १७ जुलै ते ३ ऑगस्ट दरम्यान पुरवणी परीक्षा घेण्यात आली होती. बारावीच्या पुरवणी परीक्षेला राज्यातून तब्बल १ लाख २८ हजार ९१४ विद्यार्थी बसले होते.

या पुरवणी परीक्षेत मागील वर्षांच्या तुलनेत एक टक्के निकाल वाढला असला तरी २०१७ च्या तुलनेत ती घसरण असल्याचेही समोर आले आहे. या परीक्षेत सर्वाधिक निकाल हा लातूर विभागाचा असून ३३.८९ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्या खालोखाल नागपूर आणि औरंगाबाद विभागाचे निकाल असून राज्यात सर्वात कमी निकाल हा मुंबई विभागाचा आहे. या विभागात केवळ १९.१२ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

राज्य शिक्षण मंडळाकडून फेब्रुवारी-मार्च मधील घेण्यात आलेल्या मुख्य परीक्षेनंतर जे विद्यार्थी या परीक्षेत अपयशी ठरले होते त्यांच्यासाठी ही पुरवणी परीक्षा जुलै-ऑगस्टमध्ये घेण्यात आली होती. या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांना सोबतच पारंपारिक अभ्यासक्रमांनाही लवकरच प्रवेश उपलब्ध केले जाणार आहेत. बारावीच्या पुरवणी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळावेत यासाठी संबंधित विद्यापीठ आणि संस्थांना यापूर्वी सूचना देण्यात आल्या असून त्यांचे प्रवेश सुलभ आणि गतीने व्हावे यासाठी विविध स्तरावर शिक्षण विभागाकडून माहिती घेतली जाणार आहे.

या पुरवणीपरीक्षेत ज्या विद्यार्थ्यांना आपल्या गुणांची पडताळणी करायची आहे, त्यांना २६ ऑगस्ट ते ४ सप्टेंबरदरम्यान मंडळाकडे अर्ज करता येणार आहे. तसेच ज्यांना उत्तरपत्रिकेची छायाप्रत हवी असेल त्यांनी २६ ऑगस्ट ते १४ सप्टेंबरपर्यंत शुल्कासह अर्ज करायचा आहे. अशी माहिती शिक्षण मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी दिली.

Last Updated : Aug 23, 2019, 1:49 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details