महाराष्ट्र

maharashtra

By

Published : May 27, 2021, 6:46 AM IST

Updated : May 27, 2021, 9:16 AM IST

ETV Bharat / state

अखेर नियतीने घात केला; डॉ. राहुल पवारचा उपचारादरम्यान मृत्यू

लातूरच्या एमआयटी मेडीकल कॉलेजचा कोरोनाबाधित विद्यार्थी डॉ. राहुल पवारचा औरंगाबादच्या एमजीएम रुग्णालायात बुधवारी उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला आहे. कोरोनाची लागण झाल्यानंतर तो औरंगाबादच्या एमजीएम रुग्णालयामध्ये गत 20-25 दिवसापासून मृत्यूशी झुंज देत होता.

Dr. Rahul Pawar student of Latur MIT medical collage succumbs to covid
विद्यार्थी

लातूर : लातूरच्या एमआयटी मेडीकल कॉलेजचा कोरोनाबाधित विद्यार्थी डॉ. राहुल पवारचा औरंगाबादच्या एमजीएम रुग्णालायात बुधवारी उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मृत डॉ. राहुल विश्वनाथ पवार (वय 25 वर्ष) लातूरच्या एमआयटी कॉलेजचा 'एमबीबीएस'च्या अंतिम वर्षाचा विद्यार्थी होता. कोरोनाची लागण झाल्यानंतर तो औरंगाबादच्या एमजीएम रुग्णालयामध्ये गत 20-25 दिवसापासून मृत्यूशी झुंज देत होता.

परभणी जिल्ह्यातील गरिब कुटुंबातील एका ऊसतोड कामगाराचा मुलगा व परिस्थितीशी दोन हात करत गावातून पहिलाच डॉक्टर झालेला राहुल असंख्य रुग्णांची सेवा करू पाहत होता. या डॉक्टरला एप्रिल महिन्यात परिक्षेच्या घाईगडबडीत कोरोनाचा संसर्ग झाला. त्यातच म्युकरमायकोसिसचा संसर्ग अधिक बळावत गेल्याने तब्बल 20-25 दिवसानंतर त्याचा मृत्यूशी लढा थांबला.

डॉ. राहुल पवारचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या मित्रांनी व्यक्त केल्या भावना..

'ई-टीव्ही भारत'ने दि.18 मे,2020 रोजी 'ऊसतोड कामगाराचा मुलगा डॉ. राहुल पवारची मृत्यूशी झुंज सुरुच' या मथळ्याखाली बातमी दाखवून मदतीचे आवाहन केले होते. ज्यात राहुलची संपुर्ण हकीकत सबंध महाराष्ट्राने पाहिली, वाचली. त्याचा 'इम्पॅक्ट' म्हणून दोन दिवसात तब्बल 2 लाख 76 हजार रुपयांची आर्थिक मदत थेट राहुलच्या नातेवाईकांच्या खात्यात जमाही झाली. शिवाय राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी 'ई-टीव्ही भारत'च्या बातमीची दखल घेत डॉ. राहुल पवारचा सर्व खर्च राज्य शासन करणार असल्याचे सांगितले होते. त्यानुसार डॉ. राहुलवर औरंगाबाद येथील एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू होते. परंतू आज नियतीने घात केला आणि राहुलचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

डॉ. राहुलच्या घरची परिस्थिती अत्यंत बिकट आहे. आई-वडील व छोटा भाऊ असा त्याचा परिवार आहे. आई-वडील ऊसतोड कामगार असून छोटा भाऊ सचिन 10 वीच्या वर्गात शिकतोय. तोही आई-वडिलांना ऊस तोडण्याच्या कामांमध्ये मदत करतोय. राहुलच्या उपचारासाठी कुटुंबियांनी लाखों रुपयांचे कर्ज काढून खर्च केला आहे. एवढे करुनही शेवटी राहुलचा मृत्यू झाल्याने कुटुंबियांवर दुखाचा डोंगर कोसळला आहे. त्यामुळे राहुलच्या परिवाराला भविष्यकालीन कायमस्वरुपी आधार म्हणून त्याचा लहान भावाला शासकीय सेवेत घेण्यात यावे व कुटुंबियाला राज्य शासनाने 1 कोटी रुपयांची अर्थिक मदत करावी, अशी मागणी राहुलचे डॉक्टर वर्गमित्र व एमआयटी वैद्यकिय महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी केली आहे.

नवी दिल्ली येथे डॉ. अनस मुजाहिद या तरुण डॉक्टराचा अशाच परिस्थितीत कोरोनाने मृत्यू झाला होता. याची गंभीर दखल घेत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी या तरुण डॉक्टराच्या कुटुंबाला पुनर्वसनासाठी 1 कोटीची अर्थिक मदत केली आहे. त्याच पद्धतीने महाराष्ट्र शासनानेही डॉ. राहुल पवारच्या कुटुंबियांना मदत करण्याची मागणी केली आहे.

Last Updated : May 27, 2021, 9:16 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details