महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Oct 31, 2020, 10:02 PM IST

Updated : Oct 31, 2020, 10:48 PM IST

ETV Bharat / state

ऊस दरासंदर्भातील बैठक निष्फळ; 'या' मागणीवर स्वाभिमानी ठाम

कोल्हापुरातील सर्वच कारखानदार एकरकमी एफआरपी देणार आहोत. शेतकऱ्यांच्या डोक्यातही यावर्षी एकरकमी एफआरपी मिळणार का हाच विचार होता. त्यामुळेच आम्ही हा निर्णय घेतला असून त्याच्या पलीकडे जाऊन स्वाभिमानीच्या मागण्या असतील तर तो त्यांचा विषय असल्याचे आमदार प्रकाश आवडे यांनी म्हटले आहे.

बैठकीतील छायाचित्र
बैठकीतील छायाचित्र

कोल्हापूर- ऊस दरासंदर्भातील साखर कारखानदार आणि स्वाभिमानीच्या पदाधिकाऱ्यांची पहिलीच बैठक निष्फळ ठरली आहे. तोडणीप्रमाणेच ऊस दरामध्येही 14 टक्के वाढ मिळावी. या स्वाभिमानीच्या मागणीला साखर कारखानदारांनी नकार दर्शवला आहे. त्यामुळे स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी बैठकीतून बाहेर पडत आम्ही आमच्या भूमिकेवर ठाम असल्याचे म्हटले आहे. मागण्या मान्य नाही झाल्या तर संघर्ष अटळ असल्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्रा. जालंदर पाटील यांनी बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली.

ऊस दरसंदर्भातील बैठक निष्फळ

ऊसदराचा तिढा सोडवण्यासाठी कोल्हापुरातील शासकीय विश्रामगृह येथे महत्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, आमदार प्रकाश आवाडे, आमदार पी.एन. पाटील, चंद्रदीप नरके, गणपतराव पाटील यांच्यासह अनेक कारखानदार प्रतिनिधी आणि स्वाभिमानीचे पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी स्वाभिमानीने मांडलेल्या मागण्यांपैकी एकरकमी एफआरपी देण्याच्या मागणीवर सर्वच कारखानदार राजी झाले. मात्र. ज्या पद्धतीने तोडणीमध्ये 14 टक्के वाढ करण्यात आली त्याच पद्धतीने आता ऊस दरामध्येही 14 टक्के वाढ मिळावी, या मागणीला साखर कारखानदारांनी नकार दर्शवला आहे. त्यामुळे स्वाभिमानीचे नेते आपल्या भूमिकेवर ठाम राहत बैठकीतून बाहेर पडले. शिवाय 2 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या ऊस परिषदेत सुद्धा हा मुद्दा उचलून धरणार असून जर आमच्या मागण्या मान्य केल्या नाही तर एकाही कारखान्याचे धुराडे पेटू देणार नसल्याचा इशाराही संघटनेने दिला आहे. राजू शेट्टी हे रुग्णालयात दाखल असल्याने पहिल्यांदाच त्यांच्या अनुपस्थितीत ही बैठक पार पडली. त्यामुळे स्वाभिमानीच्या मागण्यांपुढे कारखानदार नमणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र, एकरकमी एफआरपी वगळता अन्य मागण्यांसाठी सर्वच कारखानदारांनी नकार दर्शवला.

केंद्र शासनाने साखरेची किंमत वाढवावी या मागणीसाठी स्वाभिमानीने आमच्या सोबत यावे - पालकमंत्री पाटील

केंद्र सरकारने यापूर्वीच एफआरपीमध्ये वाढ केली आहे. त्यामुळे आता केंद्र शासनाने साखरेची किंमत वाढवावी या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आमच्या सोबत यावे. केंद्राकडेच आपण याबाबत पाठपुरावा करून साखरेला जास्त दर मिळवून देऊ असे पालकमंत्री सतेज पाटील यांनी म्हटले आहे. बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

परिस्थिती नाही तरीही एकरकमी एफआरपी देणार - प्रकाश आवाडे

सध्या अनेक जिल्ह्यात एकरकमी एफआरपी देण्यासारखी परिस्थिती नाही. तरीही आम्ही एकरकमी एफआरपी देण्याबाबत ठाम असून त्यापद्धतीने कोल्हापुरातील सर्वच कारखानदार एकरकमी एफआरपी देणार आहोत. शेतकऱ्यांच्या डोक्यातही यावर्षी एकरकमी एफआरपी मिळणार का हाच विचार होता. त्यामुळेच आम्ही हा निर्णय घेतला असून त्याच्या पलीकडे जाऊन स्वाभिमानीच्या मागण्या असतील तर तो त्यांचा विषय असल्याचे आमदार प्रकाश आवडे यांनी म्हटले आहे.

हेही वाचा -गोवा विद्यापीठात छत्रपती शिवाजी महाराज अध्यासन केंद्र उभारावे - संभाजीराजे छत्रपती

Last Updated : Oct 31, 2020, 10:48 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details