जळगाव - महाराष्ट्र १ मे १९६० ला स्वतंत्र घटक राज्य म्हणून उदयास आला. महाराष्ट्राने आज सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, राजकीय अशा सर्वच क्षेत्रात आघाडी घेतली आहे. गेल्या ५९ वर्षात महाराष्ट्रात सामाजिक, आर्थिक तसेच पुरोगामित्वाच्या दृष्टिकोनातून अनेक घडामोडी घडल्या. महाराष्ट्राने आपले वेगळेपण सिद्ध केले आहे. या देशाला वेळोवेळी मार्गदर्शन करणाऱ्या महाराष्ट्राने आपली मराठी अस्मिता जोपासली आहे, मराठी अस्मिता हेच महाराष्ट्राचे खरे वेगळेपण आहे, असे मत जळगावातील तरुणाईने व्यक्त केले आहे.
महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला 'ई-टीव्ही भारत'ने जळगावातील तरुणाईचे महाराष्ट्राविषयीचे मत जाणून घेतले. महाराष्ट्राची स्थापनेपासून ते आतापर्यंतची वाटचाल, तरुणाईला अभिप्रेत असलेली महाराष्ट्राची प्रगती या बाबींचा उलगडा यानिमित्ताने झाला. मराठी संस्कृती ही महाराष्ट्राची खरी ओळख आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक माणसाला त्याचा सार्थ अभिमान आहे. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, महात्मा जोतिबा फुले, छत्रपती शाहू महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर या सारख्या महापुरुषांच्या कार्यकर्तृत्वाने महाराष्ट्राची भूमी पावन झालेली आहे. त्याचप्रमाणे संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज, संत नामदेव महाराज यांच्यासारख्या थोर संतांमुळे महाराष्ट्रात वारकरी सांप्रदायाची बीजे रोवली गेली. आजही त्यांचा वारसा महाराष्ट्र जपत आहे, आणि पुढेही जपत राहील, असेही यावेळी तरुणांनी सांगितले.