जळगाव - तिसरीत असताना वडिलांचे छत्र हरपले. अशा परिस्थितीत शिवणकाम करून घराची जबाबदारी सांभाळणाऱ्या आईच्या कष्टाची जाण ठेवत चांगला अभ्यास करून मुलाने दहावीच्या परीक्षेत 93 टक्के गुण मिळवले आहेत. ही प्रेरणादायी यशकथा आहे, जळगावातील तेजस विलास चौधरी या विद्यार्थ्याची. शहरातील अनुभूती इंग्लिश मिडीयम स्कूलचा तो विद्यार्थी असून, त्याने शाळेतून पहिला क्रमांक पटकावला आहे. विशेष म्हणजे, शाळेव्यतिरिक्त कोणतीही खासगी शिकवणी न लावता त्याने हे यश मिळवले आहे.
तेजसचे वडील विलास चौधरी यांचे 2013 मध्ये आकस्मिक निधन झाले होते. वडिलांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबाच्या पालनपोषणाची संपूर्ण जबाबदारी आई अनिता चौधरी यांच्या खांद्यावर आली. पती नसल्याचे दुःख तर होतेच. पण मुलांना चांगले शिक्षण देऊन त्यांना स्वतःच्या पायवर उभं करण्यासाठी वाट्टेल ते श्रम करायची तयारी अनिता यांनी ठेवली. हीच जिद्द मनाशी बाळगून शिवणकाम करत त्यांनी कुटुंबाची जबाबदारी चोखपणे सांभाळली. वडील वारले तेव्हा तेजस तिसरीत शिकत होता. तो लहानपणापासूनच अभ्यासात हुशार असल्याने त्याला कोणत्याही गोष्टीची उणीव भासू नये म्हणून अनिता शक्य ते सर्व प्रयत्न करत होत्या.
घरची परिस्थिती हलाखीची असल्याने तेजसला चांगल्या शाळेत शिकायला पाठवणे शक्य नव्हते. मात्र, याच काळात अनिता यांना 'अनुभूती इंग्लिश मिडीयम स्कूल'बाबत माहिती मिळाली. आर्थिक दुर्बल घटकातील गुणवंत मुलांना चांगल्या दर्जाचे शिक्षण मिळावे, या उद्देशाने जैन इरिगेशनचे संस्थापक भंवरलाल जैन यांनी ही शाळा सुरू केली होती. या शाळेच्या पहिल्याच बॅचमध्ये तेजसला प्रवेश मिळाला. दहावीत तेजसने चांगला अभ्यास करून 93 टक्के गुण मिळवत आपल्या आईच्या कष्टाचे चीज केले आहे.