महाराष्ट्र

maharashtra

By

Published : May 4, 2019, 12:35 PM IST

ETV Bharat / state

अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी बनवले रेल्वेचे अपघात रोखण्यासाठी स्वयंचलित उपकरण

सध्या रेल्वे रूळ सुस्थितीत आहेत का, याची चाचपणी ट्रॅकमन रुळांवर हातोडीने दणका मारून करतात. त्यामुळे रूळ सुस्थितीत आहे; याची 100 टक्के खात्री देता येत नाही. मात्र, डोळ्यांना दिसू शकणार नाही, इतका बारीक तडा देखील हे उपकरण शोधून काढू शकते.

अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी बनवले रेल्वेचे अपघात रोखण्यासाठी स्वयंचलित उपकरण

जळगाव-भारतात दळणवळणाच्या साधनांमध्ये रेल्वेचा फार मोठा वाटा आहे. रेल्वेचे अपघात मुख्यत्वेकरून रूळ तुटण्यामुळे होतात. मात्र, दुभंगलेल्या किंवा तुटलेल्या रुळांची पूर्णकल्पना मिळाली तर रेल्वेचे अपघात टाळता येऊ शकतात. याच विचारातून जळगावातील श्रम साधना ट्रस्टच्या (एस.एस.बी.टी.) अभियांत्रिकी महाविद्यालयातील इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन विभागाच्या विद्यार्थ्यांनी एक स्वयंचलित उपकरण बनवले आहे.

'ऑटोमॅटिक ब्रोकन रेल्वे ट्रॅक डिटेक्शन विथ लाईव्ह व्हिडिओ स्ट्रीमिंग' नावाचे हे उपकरण असून ते इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन शाखेच्या अंतिम वर्षात शिकणारे अनघा चौधरी, प्रिया मंडल, करिष्मा पाटील आणि घनश्याम मतकर यांनी तयार केले आहे. हे उपकरण तयार करण्यासाठी विद्यार्थ्यांनी उद्योग क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वापरण्यात येणारे अत्याधुनिक असे रासबेरी पाय थ्री ए प्लस मॉडेल वापरले आहे. या मॉडेलचे वैशिष्ट्य म्हणजे, यात कॅमेरा, वायफाय तंत्रज्ञान तसेच इतर घटक जोडण्याची सुविधा उपलब्ध असते. हे मॉडेल वापरल्यामुळे उपकरणाची जोडणी सहज व सोपी झाली आहे. रेल्वे रूळातील तडे शोधून काढण्यासाठी उपकरणात इन्फ्रारेड सेन्सर वापरला आहे. त्याची अचूकता अल्ट्रासोनिक सेन्सरपेक्षा अधिक आहे.

अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी बनवले रेल्वेचे अपघात रोखण्यासाठी स्वयंचलित उपकरण

रुळावरील तडा शोधण्यासह रेल्वेगाडी सध्या कुठे आहे चालत आहे, याचे प्रत्यक्ष चित्रीकरण करण्यासाठी उपकरणात रासबेरी पाय कॅमेरा व्ही २ असलेले मॉडेल बसवले आहे. या कॅमेऱ्याचे कनेक्शन ब्लिंक या सॉफ्टवेअरशी जोडण्यात आले आहे. ब्लिंक हे सॉफ्टवेअर प्ले स्टोअरवर मोफत उपलब्ध असल्याने उपकरणासाठी जास्त खर्च आलेला नाही. ज्या जागेवर रुळाला तडा असेल त्या जागेची अचूक माहिती व्हावी यासाठी जीपीएस व जीएसएम मॉडेल वापरले आहे. जीपीएसमुळे त्या जागेची माहिती थेट मेलवर येते. हे उपकरण १२ व्होल्टच्या बॅटरीवर चालते, ते सौर ऊर्जेवरही चालवत येऊ शकते. एरवी अभियांत्रिकीचे विद्यार्थी मानवी जीवनात सुखसुविधा उपलब्ध होतील, हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून एखादे संशोधन करतात. परंतु आम्ही राष्ट्राच्या कामी येईल, असे उपकरण तयार करण्याचा उद्देश डोळ्यासमोर ठेवला होता. प्रामाणिक प्रयत्न केल्याने त्यात यश आल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले.

हे उपकरण बनविण्यासाठी विद्यार्थ्यांना विभागप्रमुख डॉ. एस. आर. सुरळकर, प्रा. ए. एच. करोडे व प्रा. ए. सी. वाणी यांचे मार्गदर्शन लाभले. सध्या रेल्वे रूळ सुस्थितीत आहेत का, याची चाचपणी ट्रॅकमन रुळांवर हातोडीने दणका मारून करतात. त्यामुळे रूळ सुस्थितीत आहे; याची 100 टक्के खात्री देता येत नाही. मात्र, डोळ्यांना दिसू शकणार नाही, इतका बारीक तडा देखील हे उपकरण शोधून काढू शकते. त्यामुळे रेल्वेचे अपघात रोखता येतील, असा दावा संशोधक विद्यार्थ्यांनी केला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details