जळगाव -कोरोना विषाणूचा फैलाव वेगाने होत असल्याने सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले आहे. याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून कोरोनाच्या नियंत्रणासाठी शक्य त्या उपाययोजना केल्या जात आहेत. राज्य परिवहन महामंडळाच्या जळगाव आगारात देखील प्रतिबंधात्मक उपाय केले जात आहेत. एसटी बसच्या स्वच्छतेवर अधिक भर दिला जात आहे. डिटर्जंट पावडर तसेच फिनाईलने बसेसची स्वच्छता होत आहे. तर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मास्क वापराची सक्ती केली आहे.
जळगाव आगारात सुमारे 1 हजार बसेस आहेत. त्या दररोज विविध मार्गांवर धावतात. बसमध्ये होणारी प्रवाशांची गर्दी लक्षात घेता कोरोना विषाणूचा संसर्ग वेगाने होण्याची भीती आहे. त्यामुळे बसेसच्या स्वच्छतेकडे अधिक लक्ष दिले जात आहे. या आधी बसेसची स्वच्छता केवळ पाण्याने केली जात होती. मात्र, आता या बसेस आतील बाजूने निर्जंतुक होण्याच्या दृष्टीने डिटर्जंट पावडर तसेच फिनाईलचा वापर होत आहे. प्रत्येक बस फेरी पूर्ण करून आगारात आल्यानंतर ती कार्यशाळेतील व्यवस्थापन विभागात धुतली जात आहे. बस स्वच्छ झाल्यानंतरच ती पुढील प्रवासासाठी बाहेर पडत आहे.
चालक आणि वाहकांना विशेष सूचना -
बसच्या चालक आणि वाहकांचा दररोज हजारो लोकांशी संपर्क येतो. त्यामुळे त्यांना विशेष सूचना देण्यात आल्या आहेत. त्यांनी बस मार्गस्थ होण्यापूर्वी मास्क लावावे. बस आगारात आल्यानंतर बस धुण्यासाठी रॅम्पवर लावावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.