धुळे - मनपात हद्दवाढ झालेल्या गावांतील प्रभागांमध्ये विकास कामे होत नसल्याने संतप्त झालेल्या नगरसेवकांनी महापालिकेच्या महासभेत ठिय्या आंदोलन केले. यामुळे महापालिकेत एकच राडा पहावयास मिळाला.
धुळे महापालिकेत नगरसेवकांचा गोंधळ सोमवारी धुळे महापालिकेच्या महासभेत सत्ताधारी भाजपच्या नगरसेवकांनी कामे होत नसल्याने प्रभागातील नागरिक घरी येऊन तक्रार करत असल्याचे म्हणत आंदोलन सुरू केले. घनकचरा व्यवस्थापन, मोकाट कुत्र्यांमधील खरुज, पाणीप्रश्न, खड्डेमय रस्ते, आदी विषयांवरून सत्ताधारी भाजप पक्षाचे नगरसेवक आक्रमक झाल्याचे यावेळी पहावयास मिळाले. तसेच अधिकाऱ्यांवर गंभीर स्वरूपाचे भ्रष्टाचाराचे आरोप करत प्रशासन पदाधिकाऱ्यांना बदनाम करत असल्याचाही आरोप त्यांनी केला. यामुळे सभेत एकच गोंधळ माजला होता.
हेही वाचा - सत्ता स्थापनेनंतर धुळ्यात भाजपचा जल्लोष
महासभेच्या सुरुवातीलाच भाजप नगरसेवकांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. भाजपचे नगरसेवक प्रदीप कर्पे यांच्या अभिनंदनाचा ठराव सर्व पक्षांनी हाणून पाडला. त्यानंतर हद्दपार गावातील नगरसेवकांनी आंदोलन सुरू केले. यात निवडण्यापासून तर आजतागायत आमच्या प्रभागात कामे झाली नाहीत, अधिकारी जुमानत नाहीत. साधा जेसीबीही मिळत नसल्याने आमची पत नाही, आम्ही कामे करण्याचे आश्वासन दिले. मात्र, ते पूर्ण झालेले नसल्याने प्रभागातील नागरिक पूर्वी रस्त्यांवरून बोलत असत मात्र, आता ते घरी येऊन शिवीगाळ करतात. त्यामुळे आम्ही उद्विग्न होऊन राजीनामा देण्याच्या मानसिकतेत आहोत. आमच्या प्रभागांमध्ये काम झाले नाही, तर आम्ही राजीनामा देऊ, असा पवित्रा घेत त्यांनी सभागृहातच खाली बसत ठिय्या दिला.
हेही वाचा -धुळ्यामध्ये केंद्रीय समितीच्या पथकाकडून पीक नुकसानीची पाहणी
या आंदोलनात नगरसेवक किरण अहिरराव, निशा पाटील, वंदना भामरे, नरेश चौधरी, संजय पाटील, रावसाहेब नांद्रे, गंगा मोरे, आदी नगरसेवकांनी सहभाग नोंदवला होता. अल्पसंख्याक मुस्लीम नगरसेवकांनी आपल्या प्रभागातील विविध कामांची मागणी महापालिकेकडे वेळोवेळी केली आहे. मात्र, या मागणीकडे अक्षम्य दुर्लक्ष करण्यात आले असून मागणी केलेले एकही काम करण्यात आले नाही. त्यामुळे अल्पसंख्याक मुस्लीम नगरसेवकांनी आपले निवेदन लॅमिनेशन करून आयुक्तांना सप्रेम भेट दिले आणि होत असलेल्या प्रकाराची जाणीव करून दिली. यावेळी नगरसेवकांच्या आंदोलनामुळे महापालिकेतील वातावरण चांगलेच तापले होते.
हेही वाचा - साक्रीतील 'त्या' बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभाग अपयशी, शेतकरी संतप्त