महाराष्ट्र

maharashtra

By

Published : May 14, 2021, 7:26 AM IST

Updated : May 14, 2021, 7:33 AM IST

ETV Bharat / state

वाघिणीच्या 'त्या' बछड्यांचा मृत्यू वन विभागाला जागे करणारी घटना - कल्याण कुमार

ज्या वेळी वाघीण शिकारीला गेली असेल अगदी त्याच वेळेला जोरदार पाऊस झाल्याने, डोंगर दऱ्यांवरून, जंगलातून आलेले पाणी या सायफणमध्ये आले असेल. मात्र, अचानक आलेल्या या पाण्यातून या बछड्यांना बाहेर निघता न आल्याने त्यांचा मृत्यू झाला असावा

मुख्य वनसंरक्ष
मुख्य वनसंरक्ष

भंडारा- जिल्ह्यातील गराडा बुजूर्ग गावातून जाणाऱ्या कालव्याच्या सायफणमधील पाण्यात बुडून दोन बछड्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. वाघिणीच्या अनुपस्थितीत या बछड्यांचा मृत्यू झाल्याची माहिती वन विभागाकडून देण्यात आली आहे. वाघाच्या बछड्यांचा हा मृत्यू दुर्दैवी आहेच, याशिवाय वनविभागासाठी हा वेक अप कॉल असून या घटनेची पुनरावृत्ती होऊ नये अशी प्रतिक्रिया नागपूर प्रादेशिक वनविभागाचे मुख्य वनसंरक्ष कल्याण कुमार यांनी दिली. कुमार यांनी गुरुवारी बछड्यांच्या मृत्यूच्या ठिकाणी भेट दिल्यानंतर ही प्रतिक्रिया दिली.

'त्या' बछड्यांचा मृत्यू वन विभागाला जागे करणारी घटना - कल्याण कुमार

कुमार यांनी केली घटनास्थळाची पाहणी-

भंडारा वन परीक्षेत्रातील गराडा बुजुर्ग गावाच्या तलावाजवळून गेलेल्या टेकेपार उपसा सिंचन प्रकल्पाच्या सायफणमध्ये पडल्याने या दोन महिन्यांच्या दोन बछड्यांचा मृत्यू झाला. घटना स्थळाच्या परिसरात बुधवारी वाघिणीच्या पायांचे ठसे आढळून आले होते. त्यानंतर गुरुवारी मुख्य वन संरक्षक कल्याण कुमार यांच्यासह उप वन संरक्षक एस. बी. भलावी, सहायक वन संरक्षक यशवंत नागुलवार आणि साकेत शेंडे, वन परिक्षेत्र अधिकारी विवेक राजूरकर, मानद वन्यजीव रक्षक शाहिद खान आणि नदीम खान यांनी घटनास्थळाची पाहणी केली. यावेळी त्यांनी त्या बछड्यांच्या मृत्यूची घटना कशाप्रकारे घडली असेल यांचा मागोवा घेण्याचा प्रयत्न केला.

कल्याण कुमार

वाघीण हजर नसताना दुर्घटना घडल्याची शक्यता-

हा सायफण गराडा बुजुर्ग तलावाच्या पाणलोट क्षेत्रात आहे. या सायफणमध्ये पावसाळा वगळता पाणी साचून राहत नाही. एकंदरीत परिस्थिति बघता सायफण विहिरीत थंडावा असल्या कारणाने, तसेच जंगलाला लागून असलेल्या या परिसरात लोकांचा वावर नाही. त्यामुळे वाघीणीने कदाचित आपल्या बछड्यांना तिथे ठेवले असेल. ज्या वेळी वाघीण शिकारीला गेली असेल अगदी त्याच वेळेला जोरदार पाऊस झाल्याने, डोंगर दऱ्यांवरून, जंगलातून आलेले पाणी या सायफणमध्ये आले असेल. मात्र, अचानक आलेल्या या पाण्यातून या बछड्यांना बाहेर निघता न आल्याने त्यांचा मृत्यू झाला असावा, अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. तसेच पाऊस थांबल्यानंतर पाण्याच्या प्रवाहासोबत त्या बछड्यांचे मृतदेह सायफणच्या दुसऱ्या बाजूला वाहून आले. ते मृतदेह सकाळी व्यायाम करणाऱ्या युवकांना आढळले होते.

पिलांना शोधताना वाघीण कॅमेऱ्यात कैद-

घटनास्थळी वाघिणीचे ‘पगमार्क’ आढळून आल्याने बुधवारी वन परिक्षेत्र अधिकारी विवेक राजूरकर यांनी दोन्ही विहिरीवर 4 ‘कॅमेरा ट्रॅप’ लावले होते. गुरुवारी सकाळी कॅमेरा ट्रॅपची माहिती घेतली असता, याच ठिकाणी वाघिण आपल्या बछड्यांचा शोध घेताना दिसून आली. विहिरीच्या कठड्याला तिचे शरीर घासल्याच्या खुना आढळून आल्या. वाघिणीचे केस त्या सायफणच्या भिंतीला चिकटल्याचे आढळून आले. तसेच ती वाघिण सायफणमध्ये डोकावून पाहात असल्याचेही दृश्य कॅमेऱ्यात कैद झाले आहे.

सिमेंटचे प्रीकास्ट आवरण करणार-

मुख्य वन संरक्षक (प्रादेशिक) कल्याण कुमार, यांच्या सूचनेनुसार पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता मानवटकर, कनिष्ठ अभियंता गायधने व इतर कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. सायफण विहिरीचे निरीक्षण करून त्यावर कोणत्या उपाय योजना करता येतील, यावर वन विभाग अधिकारी, मानद वन्यजीव रक्षक व पाटबंधारे विभाग अधिकारी यांच्यात सविस्तर चर्चा झाली. त्याउपरांत दुपारी पाटबंधारे विभागाचे रवी पराते, अधीक्षक अभियंता, नागपूर यांच्या उपस्थितीत सायफणला सिमेंटच्या प्रीकास्ट मटेरियलचे आवरण करण्याचा निर्णय घेण्यात आला. लवकरात लवकर हे कार्य पूर्ण करण्यात येईल असे सांगण्यात आले.

Last Updated : May 14, 2021, 7:33 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details