महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Apr 2, 2019, 9:54 PM IST

ETV Bharat / state

जयदत्त क्षीरसागर यांचा कौल भाजप की राष्ट्रवादीकडे; ५ एप्रिलला होणार निर्णय

बीडचे आमदार जयदत्त क्षीरसागर हे ५ एप्रिलला कार्यकर्त्यांशी 'मन की बात' करणार आहेत.

बीडचे आमदार जयद्त्त क्षीरसागर

बीड - राष्ट्रवादी काँग्रेसकडून दुखावलेले बीडचे आमदार जयदत्त क्षीरसागर मागील ३ वर्षापासून राष्ट्रवादी काँग्रेसपासून दूर आहेत. आता लोकसभा निवडणुकीत आमदार जयदत्त क्षीरसागर यांची भूमिका कोणाच्या बाजूने असेल याची उत्सुकता संपूर्ण राज्याला लागली आहे.

२०१४ च्या निवडणुकांमध्ये मोदी लाट थोपवत जयदत्त क्षीरसागर राष्ट्रवादीच्या तिकिटावर बीडमधून निवडून आले होते. दरम्यान, मागच्या काही महिन्यांमध्ये पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्याशी राजकीय जवळीक साधत त्यांनी राष्ट्रवादीला इशारा दिलेला आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत क्षीरसागर कोणाच्या पारड्यात आपले माप टाकतात, याचा निर्णय ५ एप्रिल रोजी होणार आहे. आयोजित कार्यकर्ता मेळाव्यातून जयदत्त क्षीरसागर हे 'मन की बात' करणार आहेत.
लोकसभा मतदारसंघात मोठ्या प्रमाणात राजकीय उलथापालथ होताना दिसत आहेत. महायुतीतून घटक पक्ष बाहेर निघत आहेत तर राष्ट्रवादीचे काही नेते भाजपला सहकार्य करण्याच्या तयारीत आहेत. एकंदरीत बीडच्या राजकारणात नेत्यांची भूमिका कार्यकर्ते व मतदार स्वीकारणार का? असा प्रश्नदेखील राजकीय वर्तुळात उपस्थित केला जात आहे.

बीडचे आमदार जयदत्त क्षीरसागर हे बीड जिल्ह्यातील संस्थानिक नेते आहेत. राजकारणातील प्रदीर्घ अनुभव व संयमी स्वभाव हे त्यांचे शक्तिस्थान आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांची भूमिका निर्णायक ठरणार आहे. बीड लोकसभा मतदारसंघात डॉ. प्रीतम मुंडे व बजरंग सोनवणे यांच्यात लढत आहे. अशा परिस्थितीत क्षीरसागर बीडमध्ये पंकजा मुंडे यांच्या पाठीशी उभे राहून भाजपला मदत करणार, की राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार यांच्या बरोबरच राहून बीड लोकसभेचे उमेदवार बजरंग सोनवणे यांच्या पारड्यात आपले माप टाकणार हे अद्यापपर्यंत तरी सांगता येत नाही. मात्र, मागील दीड वर्षातील क्षीरसागर यांच्या राजकीय हालचालीवरून ते भाजपला पाठिंबा देऊ शकतात, अशी चर्चा बीड जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात होत आहे. नगरपालिकेची धुरा सांभाळत असलेले डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांच्यासह आमदार जयदत्त क्षीरसागर हे ५ एप्रिलला कार्यकर्त्यांशी 'मन की बात' करणार आहेत.

बीड विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीकडून आमदार झालेले जयदत्त क्षीरसागर यांचे व विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यात राजकीय कुरघोड्या सुरू आहेत. यातच क्षीरसागर यांचे पुतणे संदीप क्षीरसागर यांनी बीड विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडणूक लढवण्याचा दावा केला आहे. परिणामी काका व पुतण्या यांच्यात राजकीय विरोध सुरू झाला. या सगळ्या कटकारस्थानाला राष्ट्रवादीतील बीड जिल्ह्यातील काही नेते सहभागी असल्याने आमचे घर फुटले आहे, असा आरोपदेखील अनेक वेळा आमदार क्षीरसागर यांनी केलेला आहे. आता लोकसभा निवडणुकीत बीड विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांना अधिकाधिक मतांची लीड देण्यासाठी संदीप क्षीरसागर यांनी रान उठवले आहे. तर दुसरीकडे किमान बीड विधानसभा मतदारसंघात तरी राष्ट्रवादी काँग्रेसला लीड मिळणार नाही. यासाठी नाराज गट कामाला लागला आहे. एकंदरीत ५ एप्रिलला जयदत्त क्षीरसागर काय निर्णय घेतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details