महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Jul 24, 2020, 1:59 AM IST

ETV Bharat / state

बीडमधील उर्ध्व कुंडलिका धरणाचे दरवाजे उघडले, लगतच्या गावांना सतर्कतेचा इशारा

बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यातील सोन्नाखोटा येथील उर्ध्व कुंडलिका प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरत आहे. परिणामी या धरणातून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. त्यामुळे या प्रकल्पाच्या नदीकाठी असणाऱ्या लगतच्या सर्व गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

urdhav kundalika dam beed
बीड उर्ध्व कुंडलिका धरण

बीड - जिल्ह्यातील वडवणी तालुक्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे. गुरुवारी रात्री साडेअकरा वाजता ऊर्ध्व कुंडलिका धरणातून पाणी सोडण्यास सुरूवात केली असल्याची माहिती बीडचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिली आहे. पाणीपातळी 536.55 मी झाल्यामुळे गेट क्रमांक एक आणि पाच 10 सेंटीमीटरने उचलून नदी पात्रात विसर्ग सुरू केला आहे, अशी माहीत रेखावार यांनी दिली. गुरुवारी रात्री उशिरापर्यंत बीड शहरासह वडवणी तालुक्यात पावसाने जोरदार हजेरी लावली होती.

बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यातील सोन्नाखोटा येथील उर्ध्व कुंडलिका प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरत आहे. परिणामी या धरणातून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. त्यामुळे या प्रकल्पाच्या नदीकाठी असणाऱ्या लगतच्या सर्व गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे, अशी माहिती माजलगाव उपविभागीय अधिकारी शोभा ठाकूर आणि वडवणी तहसीलदार किशन सांगळे यांनी दिली आहे.

हेही वाचा -दुचाकीच्या मदतीने पिकांची मशागत; लातुरातील तरुण शेतकऱ्याने लढवली शक्कल

संपूर्ण बीड जिल्ह्यामध्ये सध्या वडवणी तालुक्यात सर्वाधिक पर्जन्यमानाची नोंद करण्यात आलेली आहे. तालुक्यातील जवळपास सर्वच लघु मध्यम प्रकल्प, नदी, नाले, विहीरी, तलाव ओसंडून वाहत आहेत. परिणामी सतत पडणाऱ्या अतिवृष्टीच्या अनुषंगाने प्रशासनही योग्य ती दक्षता व खबरदारी घेत असून वडवणी तालुक्यातील मुख्य मध्यम जलप्रकल्प असणाऱ्या सोन्नाखोटा येथील उर्ध्व कुंडलिका प्रकल्पामध्येही मोठ्या प्रमाणात पाणीसाठा झालेला आहे. प्रकल्प संपूर्णपणे व पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी केवळ काही अंशी जागा शिल्लक आहे.

त्यामुळे प्रकल्पातील पाण्याचा विसर्ग हा पुढे नदीपात्रात केला आहे. परिणामी या प्रकल्पालगतच्या व नदी पात्राकाठच्या सर्व गावांना याचा सतर्कतेचा इशाराही प्रशासनाच्या वतीने देण्यात आला आहे. नदी पात्रालगतच्या सर्व शेतकरी व नागरिकांना प्रशासनाकडून सतर्कतेच्या सूचना दिल्या असून नदीच्या पात्रात कोणीही जाऊ नये. तसेच कोणीही नदीपात्रात आपली जनावरे सोडू नये, सर्वांनी योग्य ती खबरदारी घ्यावी व संबंधित गावाच्या तलाठी व ग्रामसेवक यांना याबाबत गावात दवंडी देण्यात यावी, अशा सूचना दिल्या असल्याचे माजलगाव उपविभागीय अधिकारी शोभा ठाकूर यांनी सांगितले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details