औरंगाबाद- लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर अनेक व्यवसायामध्ये तेजी येते. या व्यवसायामध्ये एक व्यवसाय म्हणजे मद्य विक्री. राज्यात आचारसंहिता लागू झाल्यानंतर औरंगाबाद जिल्ह्यातील मद्य विक्रीत तब्बल ३० टक्क्यांनी वाढ झाल्याचे समोर आले आहे. दरम्यान, मद्य विक्रीच्या वाढत्या विक्रीवर दारू विक्री विभागाचे लक्ष असून मद्य व्यापाऱ्यांना रोजच्या मद्य विक्रीचा अहवाल सादर करणे अनिवार्य करण्यात आले आहे.
लोकसभा निवडणुकीच्या काळात औरंगाबाद जिल्ह्यात मद्य विक्रीत तब्बल ३० टक्क्यांनी वाढ
देशभरात लोकसभा निवडणुकीच्या धूम पाहायला मिळत आहे. या रणधुमाळीत उमेदवार आपल्या कार्यकर्त्यांनी खुश करण्याासाठी अनेक मार्गाचा अवलंब करतात. त्यामध्ये मद्य हेही एक मार्ग ठरतो. या निवडणुकीच्या काळात मद्य विक्रीमध्ये तब्बल ३० टक्क्यांनी वाढ झाली.
निवडणूकीच्या काळात ड्राय डे असल्यास त्यांच्या आदल्या दिवशी मद्यविक्रीमध्ये ३ पट वाढ होते. मात्र, या उलाढालीवर दारूविक्री विभागाची करडी नजर आहे. रोज मद्य विक्रीचा अहवाल सादर करणे मद्य विक्रेत्यांना अनिवार्य करण्यात आले आहे. हा अहवाल रोज सकाळी ११ वाजण्याच्या आत पाठवणे बंधनकारक करण्यात आले आहे.
या काळात वाईन शॉपमधील मद्य विक्रीचा खप जरी वाढला असला, तरी बारमधील मद्य विक्री १० ते १५ टक्क्यांनी मंदावली आहे. बारमध्ये लागणारे कर वाचवण्यासाठी अनेक लोक वाईन शॉपवरून मद्याची खरेदी करतात. ते मद्य घरी अथवा अवैध ठिकाणी जाऊन सेवन करत असल्याचे दिसून येत आहे. निवडणुकीच्या काळात कार्यकर्त्यांची चांदी असते असे ग्रामीण भागात म्हटले जाते. हे मद्य विक्रीतील वाढ पाहून लक्षात येते.