अमरावती - महाराष्ट्राचा वारसा जतन करणे आणि संवर्धनाचा संदेश देत चंद्रपूर येथून १ मे रोजी निघालेल्या 'इको प्रो' संस्थेच्या सदस्यांचे आज अमरावतीत आगमन झाले. वेलकम पॉईंट येथे दुचाकीस्वारांचे मानद वन्यजीव संरक्षक डॉ. जयंत वाडतकर यांनी स्वागत केले.
वारसा जतन आणि संवर्धनाचा संदेश देण्यासाठी दुचाकीवरून महाराष्ट्र परिक्रमा - two wheeler rally
महाराष्ट्रातील गड-किल्ले, ऐतिहासिक स्मारके, सोबतच नैसर्गिक वारसा असलेले वन, वन्यजीव, अभयारण्ये, व्याघ्र प्रकल्पांच्या संरक्षण व संवर्धनाचा संदेश देत १ ते २० मेपर्यंत २२ दुचाकीस्वार महाराष्ट्राच्या परिक्रमेवर आहेत.

महाराष्ट्रातील पर्यावरण, वने यांसह गड-किल्ल्यांचे जतन व्हावे, याबाबत जनजागृती होणे आवश्यक आहे. जनजागृती करण्याच्या उद्देशाने आम्ही इको प्रो संस्थेचे २५ सदस्य राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात पोहचत आहे. आपला वारसा असणाऱ्या गड-किल्ल्यांसोबतच वने, वनसंपत्तीचे महत्व सर्वांना कळावे हा आमच्या उपक्रमाचा उद्देश असल्याचे इको प्रो संस्थेचे अध्यक्ष बंडू धोत्रे यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना सांगितले.
अमरावती, अचलपूर येथून पुढे नरनाळा येथे मुक्काम केल्यावर हे पथक अकोट अकोला मार्गे मुंबईच्या दिशेने निघणार आहे.संपूर्ण महाराष्ट्राची परिक्रमा पूर्ण करून हे पथक २० मे रोजी सायंकाळी चंद्रपूरला परतणार आहे.