शिर्डी- साईबाबांच्या समाधीची माती आपल्याला घरपोच मिळेल, अशाप्रकारे सोशल मीडियावर जाहिरातबाजी करत एक अज्ञात व्यक्ती साईभक्तांची दिशाभूल करून फसवणूक करत आहे. त्यामुळे त्याच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी शिर्डी ग्रामस्थांनी निवेदनपत्राद्वारे शिर्डी पोलीस उपविभागीय अधिकारी सोमनाथ वाकचौरे यांच्याकडे केली आहे.
'साईबाबांच्या समाधीची माती घरपोच'; सोशल मीडियावर खोटी जाहिरातबाजी करणाऱ्यावर कारवाईची मागणी हेही वाचा -सूर्यग्रहणामुळे साईबाबा मंदिराच्या दैनंदिन कार्यक्रमांमध्ये वेळेत बदल
शिर्डी ग्रामस्थांनी शिर्डी पोलीस ठाण्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाकचौरे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शिर्डीत ग्रामस्थांची नुकतीच ग्रामसभा पार पडली. यामध्ये साईभक्त आणि त्यांची सुरक्षा केंद्रस्थानी ठेवून भाविकांच्या फसवणुकीबाबत अनेकांनी खंत व्यक्त केली आहे. मात्र, सोशल मीडियावर एका अज्ञात व्यक्तीने साईबाबांच्या समाधीची माती घरपोच देण्याची जाहिरात दिली आहे. या जाहिरातीमध्ये व्हॉट्सअॅप नंबर देऊन भाविकांना फसवण्यात येत आहे. तसेच मातीसदृश वस्तू प्लास्टिक पाकिटामध्ये पाठवण्यात येत आहे. या नंबरबाबत अधिक तपास केला असता, ही व्यक्ती नागपूर शहरातील आनंद रोड बेझनबाग येथील असल्याचे समजले.
सोशल मीडियावर खोटी जाहिरातबाजी दरम्यान, या प्रकारामुळे देश-विदेशातील साईभक्तांमध्ये संभ्रम निर्माण झाला असून अनेक भाविकांची फसवणूक होत आहे. यावेळी उपविभागीय अधिकारी वाकचौरे यांनी तत्परता दाखवत सदर आरोपीचा शोध घेण्यासाठी आपली यंत्रणा सतर्क केली असून लवकरच या आरोपीला अटक केली जाईल, असे ग्रामस्थांना आश्वासन दिले आहे.
साईबाबा संस्थान ट्रस्ट या नावाने देशविदेशात अनेक संस्था कार्यान्वित असून त्या साईभक्तांची आर्थिक फसवणूक करत आहेत. त्यामुळे साईबाबा विश्वस्त व्यवस्था शिर्डीतील एकमात्र अधिकृत संस्थान असून या संस्थानला मोठा फटका बसत आहे. असे असताना आजपर्यंत कोणत्याही अधिकार्यांनी तसेच विश्वस्तांनी याविषयी कठोर निर्णय न घेतल्याने ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे. यावर वेळीच पायबंद घातला नाही तर देशव्यापी आंदोलन उभारणार असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
तसेच साईबाबांच्या समाधीची माती आपल्याला घरपोच मिळेल, अशाप्रकारे सोशल मीडियावर जाहिरातबाजी करणाऱ्या आणि साईभक्ताची दिशाभूल करणाऱ्या अज्ञात व्यक्तीवर कठोर कारवाई करत गुन्हा दाखल करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली. तसेच याबाबतची माहिती सदर व्यक्तीने साईबाबा संस्थानला दिली आहे, तरीसुद्धा संस्थान प्रशासन कारवाई न करता गप्प का? असा प्रश्न साईनिर्माण ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष तथा साईभक्त विजय कोते यांनी उपस्थित केला आहे.