बंगळुरु :भारत विरुद्ध श्रीलंका ( India v Sri Lanka ) संघात कसोटी मालिकेचा दुसरा सामना एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्याचा आज दुसरा दिवस आहे. भारताचा पहिला डाव 252 धावांत संपुष्टात आला होता. त्यानंतर श्रीलंका संघाचा पहिला डाव 109 धावांवर संपुष्टात आला. यामध्ये जसप्रीत बुमराहने एक खास कारनामा केला आहे. त्यानंतर आता भारताच्या दुसऱ्या डावाला सुरुवात झाली आहे. भारतीय संघाची धावसंख्या 45 षटकानंतर 4 बाद 175 झाली आहे
श्रीलंका संघाने 6 बाद 86 धावांवरुन आज खेळायला सुरुवात केली होती. श्रीलंका संघाला सातवा झटका लसिथ एम्बुल्डेनियाच्या रुपाने ( Batsman Lasith Ambuldenia ) बसला. लसिथ एम्बुल्डेनिया 16 चेंडूचा सामना करताना फक्त 1 धावेचे योगदान देऊन तंबूत परतला. त्यामुळे श्रीलंका संघाची स्थिती आणखीनच बिकट झाली. त्यानंतर ही श्रीलंका संघाचे फलंदाज सातत्याने बाद होत राहिले. ज्यामध्ये श्रीलंकेने आपले तीन फलंदाज फक्त चौदा धावात गमावले. त्यामुळे श्रीलंकेचा पहिला डाव 35.5 षटकांत 109 धावांवर संपुष्टात आला.
बुमराहने प्रथमच घेतल्या पाच विकेट्स -
भारतीय गोलंदाजांनी टिच्चून मारा करताना श्रीलंकेच्या फलंदाजांना सळो की पळो करुन सोडले. भारताकडून सर्वाधिक जास्त विकेट्स बुमराहने घेतल्या. त्याने 24 धावा देत 5 विकेट्स घेताना श्रीलंकेच्या डावाला सुरुंग लावला. त्याचबरोबर त्याने पहिल्यांदाच भारतात कसोटी खेळताना पाच विकेट्स घेण्याचा कारनामा ( Bumrah did a special deed ) केला आहे. यापूर्वी इशांत शर्माने 2015 साली कोलंबो येथील कसोटीत 54 धावा देत 5 विकेट्स घेतल्या होत्या. तसेच, वेंकटेश प्रसाद यांनी 2001 साली कँडी कसोटीत 72 धावा देत 5 विकेट्स घेण्याचा कारनामा केला होता. झहीर खानही इतक्याच धावा देऊन श्रीलंकेविरुद्ध 5 विकेट्स घेतल्या आहेत.
भारताकडून गोलंदाजी करताना आश्विन आणि मोहम्मद शमी यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या आहेत. त्याचबरोबर अक्षर पटेलला एक विकेट्स मिळाली. तसेच मागील सामन्यातील हिरो रविंद्र जडेजाला मात्र पहिल्या डावात एक ही विकेट्स घेता आली नाही.
त्याचबरोबर भारतीय संघाने आपल्या दुसऱ्या डावाला सुरुवात केली. सलामी फलंदाज रोहित शर्मा ( Opener Rohit Sharma ) आणि मयंक अग्रवाल यांनी पहिल्या गड्यासाठी 41 धावांची भागीदारी केली. त्यानंतर मयंक अग्रवाल (22) लसिथ एम्बुल्डेनियाचा बळी ठरला. त्यानंतर रोहित शर्माने 79 चेंडूत 46 धावांचे योगदान देत तंबूत परतला. त्याला धनंजय डी सिल्वाने माघारी धाडले. तसेच हनुमा विहारी देखील रोहित प्रमाणे 79 चेंडूचा सामना करताना 35 धावा केल्या. त्याला जय विक्रमाने बाद करत तंबूत पाठवले.
त्यामुळे भारतीय संघाची धावसंख्या 45 षटकानंतर 4 बाद 175 झाली आहे. सध्या रिषभ पंत आणि श्रेयस अय्यर धावपट्टीवर उपस्थित आहेत. तसेच हे दोघे अनुक्रमे 46 आणि 7 धावांवर खेळत आहेत. श्रीलंकेकडून गोलंदाजी करताना प्रविन जयविक्रमाने दोन विकेट्स घेतल्या आहेत. त्याचबरोबर धनंजय डिसिल्वा आणि एम्बुल्डेनियाने प्रत्येकी एक विकेट्स घेतली आहे.