मुंबई- 8 मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो. महिला दिन म्हणजे स्त्रीत्वाचा जणू सणच. प्रत्येक स्त्रीच्या आत्मसन्मानाला, तिच्या कर्तृत्वाला एक कृतज्ञता पूर्वक सलाम करण्याचा दिवस म्हणजे महिला दिन. ‘महिला दिन हा रोजच साजरा करायला हवा कारण केवळ एकाच दिवशी स्त्रीचे कर्तृत्व सन्मानित करणे हे मला पटत नाही. शहरांत या ‘दिनाची’ लगबग दिसून येते. पण, राज्याच्या, देशाच्या अंतर्भागातील स्त्रियांचे काय? अनेकींना असा दिवस असतो हेही माहित नसेल. जेव्हा समाजातील स्त्रीपती असलेली असमानता दूर होईल तेव्हा खऱ्या अर्थाने महिला दिन साजरा करता येईल’, तेजस्विनी पंडित म्हणाली.
महिला दिन सर्वच स्तरावर, सर्वच क्षेत्रात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो आणि याला मनोरंजनसृष्टी देखील अपवाद नाही. तेजस्विनी पंडित, प्राजक्ता माळी, गायत्री दातार, भार्गवी चिरमुले ही महिला स्टार कलाकारांची चौकडी एकत्र आली होती मराठी प्लॅनेटच्या मंचावर. यावेळी उपस्थित तारकांनी आपले मनोगत व्यक्त करताना स्त्री सक्षमीकरण, सामाजिक स्त्री-पुरुष समानता, प्रत्येक स्तरातील स्त्रीचा आदर व इतर गोष्टींचा उहापोह करत उपस्थित मीडियाकर्मींबरोबर संवाद साधला तर काहींनी त्यांच्या आयुष्यातील महत्वाच्या स्त्रियांबाबतचे मनोगतही व्यक्त केले. अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने या प्रसंगी धावती भेट दिली.
हेही वाचा -राष्ट्रीय पारितोषिक विजेते दिग्दर्शक मकरंद माने यांचं ‘पोरगं मजेतय’!