मुंबई- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पीएम नरेंद्र मोदी असे या बायोपिकचे नाव आहे. अभिनेता विवेक ओबेरॉय या चित्रपटात मोदींच्या भूमिकेत झळकणार आहे. दरम्यान चित्रपटाला होणाऱ्या विरोधावर आता विवेक ओबेरॉयची प्रतिक्रिया समोर आली आहे.
बायोपिकमधून मोदींना हिरो दाखवत नाही, ते वास्तवातच हिरो आहेत - विवेक ओबेरॉय
कदाचित त्यांना या चित्रपटाची किंवा चौकीदाराच्या दांड्याची भीती वाटत असावी, असा टोलाही त्याने लगावला आहे
हा चित्रपट सध्या प्रदर्शित झाला तर आचारसंहितेचे उल्लंघन होईल, यामुळे या चित्रपटाच्या प्रदर्शनाला स्थगिती द्यावी, अशी मागणी असलेली याचिका दाखल झाली आहे. यावर प्रतिक्रिया देत विवेकने या चित्रपटाला विरोध का केला जातोय, हे आपल्याला समजत नसल्याचे म्हटले आहे. यासोबतच अभिषेक सिंघवी आणि कपिल सिब्बल यांच्यासारखे दिग्गज आणि प्रसिद्ध वकील याविरोधातील याचिकेवर आपला वेळ का वाया घालवत आहेत, असा सवालही विवेकने केला आहे. यासोबतच कदाचित त्यांना या चित्रपटाची किंवा चौकीदाराच्या दांड्याची भीती वाटत असावी, असा टोलाही त्याने लगावला आहे.
यासोबतच आम्ही या चित्रपटातून मोदींना मोठं दाखवण्याचा प्रयत्न करत नाही आणि त्यांना यातून नायकही दाखवायचा प्रयत्न करत नाही. मुळात ते वास्तवातच नायक आहेत. केवळ माझ्यासाठी नव्हे तर देशातील करोडो लोकांसाठी. हा बायोपिक सर्वांसाठीच एक प्रेरणादायी कथा असणार असल्याचेही, विवेकने म्हटले आहे.