महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Aug 14, 2019, 9:08 AM IST

ETV Bharat / sitara

पाकिस्तानमध्ये कॉन्सर्ट केल्यामुळे 'ऑल इंडिया सिने वर्कर्स असोसिएशन'कडून गायक मिका सिंगवर बंदी

गायक मिका सिंग याने पाकिस्तानातील एका कार्यक्रमात परफॉर्म केल्यामुळे ऑल इंडिया सिने वर्कर्स असोसिएशनने त्याच्यावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. मिकाने देशप्रेमापेक्षा पैशाला अधिक महत्त्व दिल्याने त्याच्यावर हा बहिष्कार टाकण्यात आल्याचं असोसिएशनने जाहीर केलंय.

गायक मिका सिंग


बॉलिवूडमधील आघाडीचा गायक मिका सिंग याने 8 ऑगस्टला पाकिस्तानातील एका हाय प्रोफाईल व्यक्तीच्या कार्यक्रमात परफॉर्म केल्यामुळे ऑल इंडिया सिने वर्कर्स असोसिएशनने त्याच्यावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. मिकाने देशप्रेमापेक्षा पैशाला अधिक महत्त्व दिल्याने त्याच्यावर हा बहिष्कार टाकण्यात आल्याचं असोसिएशनने जाहीर केलेल्या पत्रकातून सांगण्यात आलं आहे.

भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशातील संबंध उरी, पठाणकोट आणि पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर चांगलेच चिघळले आहेत. अशात मिकाने हे सगळं विसरून पाकिस्तानात जाऊन पाकचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेज मुशर्रफ यांच्या निकटवर्तियाच्या पार्टीत जाऊन गाणे म्हणजे या हल्ल्यात वीरमरण आलेल्या सैनिकांचा आणि त्यांच्या कुटुंबीयांचा अपमान करण्याजोगं असल्याचं या पत्रकात म्हणण्यात आलं आहे.

ऑल इंडिया सिने वर्कर्स असोसिएशन

त्यामुळे मुंबईतील सर्व प्रमुख निर्माते, स्टुडिओ, म्युझिक कंपन्या, प्रोडक्शन्स हाऊस यांनी यापुढे मिका सोबत काम करू नये असं त्यांना या पत्रकातून बजावण्यात आलं आहे. त्याशिवाय त्याच्यासोबत सुरू असलेली सर्व कॉन्ट्रॅक्ट रद्द करून त्याच्यवर पूर्ण बहिष्कार टाकण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

ऑल इंडिया सिने वर्कर्स असोसिएशनचे अध्यक्ष सुरेश गुप्ता यांनी त्यांच्या सहीनिशी हे पत्रक जाहीर केलं असून ते त्यानी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय माहिती प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनाही पाठवलं आहे.

मिकाने या बहिष्काराबाबत अद्याप कोणतंही स्पष्टीकरण दिलेलं नाही. तर दुसरीकडे असोसिएशनच्या या बहिष्काराला इंडस्ट्रीकडून कसा प्रतिसाद मिळतो हे ही लवकरच स्पष्ट होईल.

ABOUT THE AUTHOR

...view details