नवीन वर्षामध्ये ओटीटी प्लॅटफॉर्मवर मनोरंजनाची बरीच रेलचेल पाहायला मिळणार आहे. यामध्ये काही नवे चित्रपट आणि वेब शोंचा समावेश आहे. जानेवारीमध्ये अनेक चित्रपट आणि वेब सिरीज रिलीज होणार आहेत. गेल्या वर्षी प्रदर्शित झालेले अनेक चित्रपट या आठवड्यात ओटीटीवर स्ट्रीम केले जाणार आहेत, तर काही मूळ मालिका देखील पहायला मिळणार आहेत.
अमिताभ यांचा उंचाई होणार प्रदर्शित- गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झालेला अमिताभ बच्चन यांचा चित्रपट 'उंचाई' ही मैत्रीची कहाणी आहे, ज्यामध्ये अमिताभ बच्चन, अनुपम खेर, बोमन इराणी आणि डॅनी डेन्झोंगपा बेस्ट फ्रेंडच्या भूमिकेत आहेत. या चित्रपटात सारिका, नीना गुप्ता आणि परिणीती चोप्रा यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. बच्चन, खेर आणि इराणी त्यांचे दिवंगत मित्र भूपेन (डेन्झोंगपा) यांची इच्छा पूर्ण करण्यासाठी एव्हरेस्ट बेस कॅम्पवर जाण्याचा निर्णय घेतात. यात ते यशस्वी होतील का? त्यांना कोणत्या समस्यांना सामोरे जावे लागते, हे सर्व चित्रपटात पाहायला मिळणार आहे. हा चित्रपट झी ५ या ओटीटीवर पाहायला मिळेल. सूरज बडजात्या दिग्दर्शित उंचाई हा चित्रपट ६ जानेवारीपासून प्रवाहित होईल.
भुवन बामच्या ताजा खबरची लेटेस्ट न्यूज - भुवन बाम त्याच्या पॉवर-पॅक कॉमेडीजसाठी ओळखला जातो, यावेळी तो ओटीटीवर 'ताजा खबर' मालिका घेऊन येत आहे. या मालिकेकडे वसंत गावडे या स्वच्छता कामगाराच्या दृष्टिकोनातून पाहिले जाते. या शोच्या ट्रेलरला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आणि बीबीचे चाहते या मालिकेची आतुरतेने वाट पाहत होते. हिमांक गौर दिग्दर्शित हा शो आता डिस्ने प्लस ङॉयस्टारवर ६ जानेवारीपासून प्रवाहित होईल.