मुंबई - नेहमीचे साचेबंद विषय घेऊन काढलेले चित्रपट धपाधप कोसळताहेत. पूर्वी फॉर्म्युला चित्रपट म्हणून ओळखले जाणारे चित्रपट आता अजिबात चालत नाहीत. एक हिरो, एक किंवा दोन हिरॉइन्स, एक व्हिलन, तोंडी लावायला कॉमेडी, नाचगाण्यासाठी संगीत, क्लायमॅक्स ला दे दणादण मारामारी आणि शेवट गोड असा फॉर्म्युला सर्रासपणे वापरला जायचा आणि असे अनेक चित्रपट सुपरहिट सुद्धा झालेत. परंतु आताच्या घडीचा प्रेक्षक सुज्ञ झालाय. त्याला प्रत्येक गोष्टीत लॉजिक लागते तसेच सकस संहिता आणि त्याचे अर्थपूर्ण सादरीकरण असेल तरच तो चित्रपटगृहाच्या पायऱ्या चढतो. अन्यथा मनोरंजन आता त्याच्या मुठीत आलंय म्हणजेच तो आता मोबाईलवर मालिका, चित्रपट, वेब सिरीज पाहतो तेही त्याच्या सोयीनुसार. अर्थात हा बदल येण्याचे अजून एक कारण आहे ते म्हणजे कोरोना महामारीमुळे लादला गेलेला लॉकडाऊन. या काळात ओटीटी हेच एक साधन होते मनोरंजित होण्याचे. त्या सुमारास जागतिक पटलावर मनोरंजनसृष्टीत काय काय घडतंय आणि किती सकस विषयांची कशी हाताळणी होतेय हे समजून आले.
वर नमूद केल्याप्रमाणे या सर्व बदलात मोठा वाटा होता कोरोना कालखंडाचा. जेव्हा ही महामारी जगभरात पसरली तेव्हा संपूर्ण जग थांबले होते. या विषाणूची उत्पत्ती आपल्या शेजारील देशात झाली होती असे बरेच देश ओरडून सांगत होते. असंही म्हटलं जात होतं की त्या देशाने आपल्या शत्रू देशांना नामोहरम करण्यासाठी या विषाणूची निर्मिती केली होती. परंतु काही कारणास्तव ज्या प्रयोगशाळेत कोरोना विषाणूची पैदास केली जात होती तिथे गळती झाली आणि त्याच देशाला पहिला फटका बसला. परंतु तो अपराधी देश मात्र सतत नकारघंटा वाजवत आला आहे. परंतु जगभरात आता कोरोना उत्पत्ती कुठून झाली याचा शोध घेण्याच्या हालचाली जोरात सुरु झाल्या आहेत. भारतातही अशी हालचाल होत असल्याची कुणकुण आहे. लेखक, दिग्दर्शक अभिषेक शर्मा या विषयावर सिनेमा काढण्याच्या तयारीत आहेत. अभिषेक शर्मा एक उत्तम दिग्दर्शक म्हणून ओळखले जातात आणि त्यांना आर्थिक बळ देण्यासाठी मैदानात उतरले आहेत निर्माते महावीर जैन.