महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Dec 27, 2020, 11:19 AM IST

ETV Bharat / city

काँग्रेसचा 'सुपर-१०००' उपक्रम : राज्यातील निवडणुकीत युवकांना देणार थेट संधी - सत्यजीत तांबे

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या माध्यमातून राज्यात काँग्रेसकडून तरुणांना संधी देण्याचा उपक्रम राबविण्यात येत आहे. काँग्रेस राज्यात १००० उमेदवारांना संधी देऊन निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची माहिती युवक प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी माहिती दिली.

solapur_aa
काँग्रेसचा 'सुपर-१०००' उपक्रम

सोलापूर - राज्यात काँग्रेसचे भावी नेतृत्व तयार करण्यासाठी काँग्रेस पक्षाच्या वतीने 'सुपर-1000' या नावाचा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून युवकांना स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये काँग्रेसकडून संधी देण्यात येणार आहे. काँग्रेसचे युवक प्रदेश अध्यक्ष सत्यजीत तांबे-पाटील यांनी याबाबतची माहिती दिली. तांबे हे शनिवारी सोलापूर दौऱ्यावर आले होते, त्यावेळी त्यांना पत्रकारांशी संवाद साधला.

तांबे-पाटील म्हणाले, 2009 आणि 2014 च्या निवडणुकीत काँग्रेसने सुपर-60 उपक्रम राबविला होता. त्यावेळी 60 जागांपैकी 48 जागांवर काँग्रेसला यश मिळाले होते. याचाच विचार करून काँग्रेस मध्ये तरुणांची राजकीय फळी निर्माण करण्यासाठी 'सुपर-1000 उपक्रम' राज्यभर राबविण्यात येत आहे. यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये 1000 तरुण-तरुणींना संधी देण्यात येणार आहे. जे भविष्यात काँग्रेसचे नेतृत्व करू शकतील, असे देखील सत्यजीत तांबे यांनी सांगितले.

युवक काँग्रेसकडून थेट उमेदवारी-

राज्यातील पंचायत समिती, जिल्हा परिषद, महानगरपालिका, आणि ग्रामपंचायत या ठिकाणी होऊ घातलेल्या निवडणुकीमध्ये 1000 तरुण-तरुणींना निवडणूक लढवण्याची संधी देणार असल्याची माहिती युवक प्रदेश अध्यक्ष सत्यजित तांबे यांनी दिली. या 1000 तरुण तरुणींना उमेदवारी देण्याबरोबरच त्यांना निवडून आणण्यासाठी युवक काँग्रेसची ताकदही दिली जाईल, असेही तांबे यांनी यावेळी स्पष्ट केले.

सुपर 1000 उपक्रमाची सोलापूरमधून सुरुवात-

युवक काँग्रेसने पुढाकार घेऊन सुरू केलेल्या या उपक्रमाची सुरुवात सोलापूर जिल्ह्यातूनच करण्यात आली आहे. सोलापूर हा काँग्रेसचा पारंपरिक मतदारसंघ होता. सोलापूर जिल्ह्यात सुरुवातीपासूनच काँग्रेसची विचारधारा रुजलेली आहे. त्यानंतर मात्र, राष्ट्रवादी आणि भाजप शिवसेना या पक्षांची विचारधार जिल्ह्यात वाढीस लागली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये राष्ट्रवादीचे वर्चस्व जास्त असल्याचे दिसून येत आहे. आता तरुणांना संधी दिल्यानंतर काँग्रेसची सुपर १००० कशाप्रकारे प्रभाव पाडेल हे येणारा काळच ठरवेल.

ABOUT THE AUTHOR

...view details