महाराष्ट्र

maharashtra

राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक; ओबीसी आरक्षण, कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येबाबत चर्चा होण्याची शक्यता

By

Published : Sep 15, 2021, 10:18 AM IST

राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक असून या बैठकीत ओबीसी आरक्षण आणि कोरोनाच्या वाढती रुग्णसंख्या याबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे. ओबीसी राजकीय आरक्षण संपुष्टात आल्यानंतर राज्य सरकारसमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. याबाबत या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे.

state cabinet meeting
मंत्रालय मुंबई

मुंबई - राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज (बुधवार) दुपारी साडेतीन वाजता सह्याद्री अतिथीगृह येथे होणार आहे. या बैठकीमध्ये काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होणार असल्याची माहिती आहे. ओबीसी राजकीय आरक्षण संपुष्टात आल्यानंतर राज्य सरकारसमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. याबाबत या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. तसेच सण उत्सवाच्या दिवसात कोरोना रुग्णांची वाढती संख्या याबाबत देखील चर्चा होणार आहे.

ओबीसी आरक्षणाचा पेच
ओबीसींचे राजकीय आरक्षण नियमित होत नाही, तोपर्यंत निवडणूक पुढे ढकलावी अशी भूमिका राज्यातील सर्वच राजकीय पक्षांनी घेतली. मात्र निवडणुका घ्याव्यात किंवा घेऊ नयेत याबाबत केवळ निवडणूक आयोग निर्णय घेऊ शकते. याबाबत निर्णय घेण्याचा अधिकार राज्य सरकारला नसल्याचे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले. त्यानंतर राज्य सरकार समोरील अडचणी वाढल्या आहेत. धुळे, अकोला, नंदुरबार, नागपूर आणि वाशिम या जिल्ह्यातील नगरपंचायत आणि पंचायत समितीच्या निवडणुका कधीही घोषित होऊ शकतात. त्यामुळे ओबीसींच्या राजकीय आरक्षणाबाबत नेमकी काय भूमिका घ्यायची? याबाबत आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. दरम्यान, आज भारतीय जनता पक्षाच्या वतीने ओबीसींच्या राजकीय आरक्षणासाठी राज्यभर आंदोलन केले जाणार आहे.

कोरोनाची वाढती रुग्णसंख्या
सण उत्सवाच्या काळात रुग्ण संख्या वाढल्यास निर्बंध अजूनही कडक करावे लागतील असे संकेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आधीच दिले आहेत. गणेशोत्सव राज्यभर उत्साहात साजरा केला जातोय. यातच नवरात्र, दिवाळी हे सण तोंडावर आहेत. गणेशोत्सवादरम्यान रुग्णांची आकडेवारी वाढत आहे. याबाबत राज्य सरकारने चिंता व्यक्त केली आहे. त्यामुळे या मुद्द्यावर देखील आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा केली जाणार असून निर्बंध वाढीसंदर्भात राज्य सरकार निर्णय घेणार का? याकडे सगळ्यांचे लक्ष असणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details