महाराष्ट्र

maharashtra

By

Published : May 14, 2021, 9:05 PM IST

ETV Bharat / city

कोरोना विरोधातील लढाईत मंदिरं, गुरुद्वारंही सक्रीय, तर जैन मंदिरात लसीकरण

सध्याच्या कोरोना परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील अनेक मंदिरांचे रुपांतर कोविड सेंटरमध्ये करण्यात आले, तर काही गुरुद्वारांमध्ये ऑक्सिजन लंगर सुरू करण्यात आला आहे.

मंदिरातील कोविड सेंटर
मंदिरातील कोविड सेंटर

मुंबई -राज्यात सध्या कोरोना रुग्ण वाढत आहेत. त्यासाठी लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. अनेक रुग्णालयांमध्ये बेड, ऑक्सिजन, व्हेंटिलेटरची तुटवडा भासत आहे. सध्याच्या कोरोना परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील अनेक मंदिरांचे रुपांतर कोविड सेंटरमध्ये करण्यात आले, तर काही गुरुद्वारांमध्ये ऑक्सिजन लंगर सुरू करण्यात आला आहे.

पावनधाम मंदिरात कोविड सेंटर उभे

नवीन कोरोना रुग्णांना रुग्णालयांमध्ये बेड मिळत नाहीत. त्यामुळे अनेक ठिकाणी एका बेडवर दोन रुग्ण अशी परिस्थिती आहे. अशा परिस्थितीत मुंबईतील कांदिवली येथील पावनधाम मंदिरात कोविड सेंटर उभे करण्यात आले आहे. सध्या येथे 100 बेडची आणि ऑक्सिजनचीही व्यवस्था करण्यात आली आहे. या मंदिरातील रुग्णालयात 24 तास डॉक्टरांचे एक पथक उपलब्ध आहे.

दादरच्या गुरुद्वारात 'ऑक्सिजन लंगर'

ऑक्सिजन अभावी रुग्णांचे हाल होऊ नयेत, रुग्णांचे आरोग्य जपता यावे, त्यांना वेळेत ऑक्सिजन मिळावे यासाठी दादर पूर्व येथील श्री. गुरू सिंग सभा गुरुद्वारा समितीने पुढाकार घेतला आहे. त्यांनी विनामूल्य 'ऑक्सिजन लंगर' सेवा सुरू केली आहे. त्यामुळे, अनेक रुग्णांना दिलासा मिळत आहे. गरजूंना वेळेत ऑक्सिजन मिळावे यासाठी छोटे आणि जम्बो, असे एकूण 80 ऑक्सिजन सिलिंडर खरेदी केले आहेत. अजूनही ऑक्सिजन सिलिंडर मागवले असल्याचे श्री. गुरु सिंग सभा गुरुद्वाराचे अध्यक्ष रघबीर सिंग गिल यांनी सांगितले.

जैन मंदिरात लसीकरण मोहीम

कोरोनाच्या विरूद्ध लढा देण्यासाठी मुंबईतील अंधेरी पूर्वेतील जे.बी.नगर येथील जैन मंदिरात लसीकरण मोहीम राबवण्यात येत आहे. या जैन मंदिरात लसी ठेवण्यासाठी रेफ्रिजरेटर, डॉक्टरांना विश्रांतीसाठी रुम आणि सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. कोविन या अधिकृत लसीकरण अॅपवर 'Tarunbharat Jain Mandir' या नावाने हे केंद्र सुरू आहे. सेव्हन हिल्स रुग्णालयातर्फे मंदिरात लसीकरण मोहीम राबवली जात आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details