महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Mar 1, 2021, 7:06 AM IST

ETV Bharat / city

राज्यपाल कोश्यारी राजधर्म कधी पाळणार? शिवसेनेचा विरोधकांवर निशाणा

विरोधी पक्षाला तिच्या मृत्यूची चिंता वाटणे स्वाभाविक आहे, पण चिंता वाटणे आणि त्याचे भांडवल करणे यात फरक आहे. अशी चिंता मग राज्यातील प्रत्येक संशयास्पद मृत्यूप्रकरणी वाटायला हवी. दादरा-नगर हवेलीचे लोकप्रिय खासदार मोहन डेलकर यांनी मुंबईत येऊन गूढ पद्धतीने आत्महत्या केली. पण मोहन डेलकरांच्या आत्महत्येबाबत भाजपच्या मंडळींना काहीच वाटत नाही का? असा सवाल शिवसेनेने केला आहे.

Saamana
राज्यपाल कोश्यारी राजधर्म कधी पाळणार

मुंबई- पूजा चव्हाण हिच्या मृत्यू प्रकरणी वनमंत्री संजय राठोड यांचा राजीनामा घेतल्याशिवाय अधिवेशन चालू देणार नाही, असा शड्डू विरोधी पक्षनेते फडणवीस यांनी ठोकला होता. त्यानंतर राठोड यांनी मुख्यमंत्र्यांकडे राजीनामा सादर केला आहे. या प्रकरणात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राजधर्माचे पालन केले आहे. तसेच हा राज धर्म पाळण्याची जबाबदारी विरोधी पक्षाचीदेखील आहेच व भाजपने नेमलेल्या राज्यपाल महोदयांची तर जास्तच आहे. राज्यपालनियुक्त 12 सदस्यांची यादी राजभवनात कुणाच्या खुर्चीत दडवून ठेवली आहे? असा सवाल करत शिवसेनेने पुन्हा एकदा राज्यपाल आणि विरोधी पक्ष भाजपावर निशाणा साधला आहे.

राज्यपालांनी ठाकरे सरकारशी जो उभा दावा मांडला आहे, 12 आमदारांच्या नियुक्त्या ज्या पद्धतीने लटकवून ठेवल्या आहेत, हे घटनेच्या विरुद्ध आहे. राजधर्माचे पालन न करण्याचे हे काम आहे. मुख्यमंत्र्यांनी राजधर्माचे पालन केल्याने विरोधकांच्या तथाकथित वादळातील हवाच गेली. राज्यपाल, विरोधी पक्ष राजधर्म कधी पाळणार? असा सवाल शिवसेनेने पक्षाचे मुखपत्र सामनाच्या अग्रलेखातून केला आहे.

पूजा प्रमाणे डेलकरांसाठी आरोळ्या का नाहीत?

पुण्यातील पूजा चव्हाण यांचे प्रकरण नक्कीच गूढ आणि चिंताजनक आहे. विरोधी पक्षाला तिच्या मृत्यूची चिंता वाटणे स्वाभाविक आहे, पण चिंता वाटणे आणि त्याचे भांडवल करणे यात फरक आहे. अशी चिंता मग राज्यातील प्रत्येक संशयास्पद मृत्यूप्रकरणी वाटायला हवी. दादरा-नगर हवेलीचे लोकप्रिय खासदार मोहन डेलकर यांनी मुंबईत येऊन गूढ पद्धतीने आत्महत्या केली. आपण का आत्महत्या करत आहोत? आपल्या आत्महत्येस जबाबदार कोण? हे सर्व त्यांनी आत्महत्येपूर्वी लिहून ठेवले. त्यात भारतीय जनता पक्षाच्या प्रमुख लोकांचा उल्लेख आहे, पण मोहन डेलकरांच्या आत्महत्येबाबत भाजपच्या मंडळींना काहीच वाटत नाही का? असा सवाल शिवसेनेने केला आहे.

विधिमंडळाचे अधिवेशन चालू देणार नाही, ही भूमिका पंतप्रधान मोदी यांना मान्य होईल काय? चर्चेतून मार्ग निघतो, आंदोलन करण्याची गरज नाही, असे श्री. मोदी वारंवार सांगत आहेत, पण महाराष्ट्र आणि पश्चिम बंगालातील भाजप ते ऐकायला तयार नाही, असा टोलाही शिवसेनेने भाजपाला लगावला आहे.

मनसे नेते राज ठाकरेंवर निशाणा-

महाराष्ट्रात विरोधकांनी उचलून धरावे असे अनेक प्रश्न आहेत. राज्यात कोरोना संसर्गाचे संकट गंभीर वळणावर पोहोचले आहे. नवे रुग्ण आणि बळी वाढू लागले आहेत. राज्यातील काही पुढारी ''आपण मास्क वगैरे लावणार नाही'', असे जाहीरपणे सांगत कोरोना संसर्गाची थट्टा करीत आहेत, असा अप्रत्यक्ष टोला महाराष्ट्र नव निर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना देखील लगावला आहे. मराठी राजभाषा दिनाच्या एका कार्यक्रमात राज यांनी मी मास्क लावतच नाही, अशी प्रतिक्रिया दिली होती.

यावरसुद्धा चर्चा होणे गरजेचे -

मराठा आरक्षणाचा गुंता सोडविण्यासाठी श्रीमंत छत्रपती उदयनराजे हे अनेक नेत्यांच्या भेटीगाठी घेत आहेत. या प्रश्नावर विधिमंडळात चर्चा घडवून मार्ग शोधला पाहिजे. धनगर आरक्षणाचाही तिढा कायमच आहे. वीज बिलांचा मुद्दा आहेच. शेतकऱयांचे प्रश्न आहेत. काही विषयांवर शिक्षकांचे आंदोलन सुरू आहे. विरोधी पक्षाने या सर्व प्रश्नांवर चर्चा केली आणि सरकारला मार्गदर्शन केले तर राज्याला गतीच मिळेल, असे सांगत इतर महत्वाच्या प्रश्नांकडे विरोधक डोळेझाक करत असल्याचा टोला लगावला.

इंधन दरवाढीवर विरोधक सभात्याग करणार का?

राज्यातील सर्वात भेडसावणारा प्रश्न कोणता असेल तर तो पेट्रोल आणि डिझेल दरवाढीचा आहे. लोकांचे कंबरडेच या दरवाढीने मोडले आहे. पेट्रोल दरवाढीने शंभरी पार केली. देशभरातील विरोधी पक्ष त्यावर आंदोलने करीत असताना महाराष्ट्रातला विरोधी पक्ष मात्र याबाबत थंड गोळा होऊन पडला आहे. हे कसले लक्षण मानावे? निदान उद्याच्या विधिमंडळ अधिवेशनात विरोधी पक्षाने पेट्रोल-डिझेल दरवाढीवर एखादा सभात्याग तरी करावा. म्हणजे विरोधी पक्षाच्या या संतप्त भावना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पंतप्रधानांना कळवतील, असा उपरोधिक टोलाही भाजपाच्या दुटप्पी भूमिकेवरून लगावला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details