महाराष्ट्र

maharashtra

Devendra Fadnavis : महाविकास आघाडी नव्हे घोटाळ्यांचे सरकार, फडणवीसांचा विधानसभेत घणाघात

By

Published : Mar 24, 2022, 10:49 PM IST

राज्यातील महाविकास आघाडी सरकार म्हणजे मद्यविक्री आघाडी आहे. इतकेच काय प्रत्येक क्षेत्रात वेगवेगळ्या घोटाळ्यांचा उच्चांक या सरकारने गाठला आहे. हे घोटाळ्यांचे सरकार आहे, असा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ( Devendra Fadnavis Criticized Mahavikas Aghadi ) केला.

Devendra Fadnavis
Devendra Fadnavis

मुंबई -राज्यातील महाविकास आघाडी सरकार म्हणजे मद्यविक्री आघाडी आहे. इतकेच काय प्रत्येक क्षेत्रात वेगवेगळ्या घोटाळ्यांचा उच्चांक या सरकारने गाठला आहे. हे घोटाळ्यांचे सरकार आहे, असा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ( Devendra Fadnavis Criticized Mahavikas Aghadi ) केला. विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शेवटच्या अंतिम आठवडा प्रस्ताव मांडताना देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांसह राज्य सरकारवर जोरदार हल्ला चढवला. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका लक्षात घेऊन मुंबई महानगरपालिकेच्या कारभाराचे वाभाडे त्यांनी विधानसभेत काढले.

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, दहिसर येथील पूर्ण अतिक्रमणात असलेली जमीन अजमेरा विकासकाने दोन कोटी ५५ लाख रुपयांत खरेदी केली. जमीन खरेदी केल्यानंतर तो जमीन खाली करून द्या म्हणून महानगरपालिकेच्या मागे लागला. तत्कालीन आयुक्त सीताराम कुंटे अजय मेहता यांनी सदरची जमीन खाली करू नये, असा शेरा मारला होता. तरी, सदरची जमीन अधिग्रहण करून ३४९ कोटी रुपये देऊन महापालिकेने खरेदी केली आहे. याच कालावधीत माहुल पंपिंग स्टेशनसाठी जागेची आवश्यकता आहे, असे भासवून अजमेरा बिल्डरची ही जमीन कशी योग्य आहे. हे दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला, असा आरोप फडणवीसांनी केला.

स्थायी समिती अध्यक्षांची मालमत्ता भरारी -स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या बेनामी मालमत्तेचे आकडे डोळे दिपवणारे असल्याचे फडणवीस यांनी म्हटलं. अध्यक्षांची तीनशे कोटींची बेनामी मालमत्ता समोर आली असून, गेल्या चोवीस महिन्यात त्यांनी ३८ मालमत्ता खरेदी केल्याचे उघडकीस आल्याचेही फडणवीस यांनी सांगितले.

कोरोना काळात रुग्णांना औषध नाही -कोरोना काळात रुग्ण खरेदी औषध खरेदीसाठी महापौरांकडे फाईल गेली असता त्या फाइलवर सही करण्यात आली नाही. कालांतराने ही फाईल गहाळ झाल्याचे निदर्शनास आले, असे करता करता एक वर्ष रुग्णांना औषधे मिळाली नाहीत. त्यानंतर ही औषधे घेतली ती बाजारभावापेक्षा जास्त दराने घेतल्याचा, आरोप फडणवीस यांनी केला.

'त्या' प्रकरणाची चौकशी करा -फडणवीस यांनी पुढे सांगितले की, माजी पोलीस अधिकारी इसाक बागवान यांनीही नातेवाईकांच्या नावाने बारामती मध्ये बेनामी मालमत्ता खरेदी केली आहे. ज्या व्यक्तीच्या नावाने त्यांनी ही मालमत्ता खरेदी केली होती. त्या व्यक्तीने आता ही मालमत्ता बागवान यांना बक्षीस पत्र म्हणून दिली आहे. या प्रकरणांमध्ये ठाण्यातील कारागृहात असलेल्या दोन आरोपींचा संबंध असून, हे आरोपी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीम याच्याशी संबंधित आहेत. तर या प्रकरणात एका राजकीय पक्षाचे दोन मोठे नेतेही सहभागी असल्याचा आरोप फडणवीस यांनी केला. या प्रकरणाची चौकशी सीबीआयकडे किंवा ए.एन.आय द्वारे करावी, अशी मागणीही फडणवीसांनी केली आहे.

हेही वाचा -MH Assembly Budget Session : मुंबईत आमदारांसाठी होणार गृहप्रकल्प, मंत्री जितेंद्र आव्हाड यांची माहिती

ABOUT THE AUTHOR

...view details