मुंबई -मुंबई विद्यापीठाच्या विधी विभागाच्या सर्व परीक्षा आणि त्यांचे पेपर मराठीतून घेण्यात यावेत अन्यथा याविरोधात तीव्र आंदेालन छेडले जाईल, असा इशारा मसला या विद्यार्थी संघटनेने २० दिवसांपूर्वी दिला होता. त्या इशाऱ्याची गंभीर दखल घेत आज विद्यापीठाने एल.एल.एम या अभ्यासक्रमाचे प्रवेश आणि त्या अभ्यासक्रमाच्या प्रश्नपत्रिका या मराठीत काढण्याचा निर्णय आज घेतला. या निर्णयाचा मराठी भाषेतून पेपर लिहणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठा फायदा होणार आहे.
यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून पदव्युत्तर विधीच्या एल.एल.एम या दोन वर्षीय अभ्यासक्रमाला प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांना एल.एल.एम. परीक्षेच्या प्रश्नपत्रिका इंग्रजीसह मराठी भाषेत उपलब्ध होणार आहेत. त्यासाठी आज झालेल्या विद्या परिषदेच्या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. त्याचे मसला या विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष अॅड. सिद्धार्थ इंगळे यांनी स्वागत केले आहे. आता एलएलएमसोबतच पदवीच्या एलएलबी आणि इतर पदविका अभ्यासक्रमांचेही पेपर मराठीत काढण्याचा निर्णय विद्यापीठाने घ्यावा, अशी मागणी इंगळे यांनी केली.