मुंबई -बॉलिवूड इंडस्ट्री उत्तर प्रदेशला घेऊन जाणार असल्याच्या चर्चेवरून जोरदार राजकारण रंगले आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ मुंबईच्या दौऱ्यावर आले होते. उत्तर प्रदेशमध्ये फिल्म सिटी उभी करण्याची घोषणा त्यांनी यापूर्वीच केली होती. त्या पार्श्वभूमीवर त्यांनी मुंबईतील अनेक निर्माते आणि सिने क्षेत्रातील लोकांची भेट घेतली. योगी आदित्यनाथ यांच्यावर महाविकास आघाडीतील नेत्यांनी टीका देखील केली आहे. दरम्यान, या टिकेला भाजप नेते आशिष शेलार यांनी ट्विट करत उत्तर दिले आहे.
काय म्हणाले आशिष शेलार?
सततच्या विरोधामुळे, जैतापूर आणि नाणार होणार की जाणार? बुलेट ट्रेनलाही विरोधाचा ब्रेक लागला. तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या कार्यपद्धतीमुळे, आंतरराष्ट्रीय आर्थिक सेवा केंद्र परराज्यात गेले."अशी" कार्यपद्धती फिल्म सिटीला मारक नाही ना ठरणार? महाराष्ट्राचे नुकसान करु नका, अशी टीका भाजप नेते आशिष शेलार यांनी ट्विट करत ठाकरे सरकारवर केली आहे.
ठाकरे सरकार हे स्थगिती सरकार
आशिष शेलार यांनी थेट माजी मुख्यमंत्री व काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर खोचक टीका केली आहे. तसेच ठाकरे सरकार हे स्थगिती सरकार आहे, असं भाजप नेते वारंवार म्हणत आले आहेत. त्यात आज पुन्हा शेलार यांनी अशीच परिस्थिती कार्यपद्धती राहिली तर ते मुंबई फिल्म सिटीला मारक ठरेल. महाराष्ट्रचं नुकसान करू नका, असे म्हटले आहे.
ती काय पर्स आहे का? कुणीच कुणाची गोष्ट घेऊन जात नाही -
ही काय पर्स आहे का? की ती कुणीही घेऊन निघून जाईल. ही खुली स्पर्धा आहे. सुरक्षा देण्याची, सामाजिक सुरक्षा देण्याची, कुणासोबत भेदभाव न करता चांगले वातावरण देण्याची गरज आहे. ती प्रत्येकाने दिली पाहिजे, असे योगी आदित्यनाथ यांनी सांगितले. मुंबई फिल्म सिटी आपले काम करेल. यूपीतील नवी फिल्म सिटी त्यांचे काम करेल, असेही योगी यावेळी म्हणाले.
हेही वाचा-बॉलिवूड मुंबईतच राहणार, आम्ही काहीच घेऊन जायला आलो नाही; योगींचे शिवसेनेला प्रत्युत्तर
हेही वाचा-मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण : 3 डिसेंबरला सुनावणीवेळी गैरहजर असलेल्या आरोपींना दोन हजारांचा दंड