महाराष्ट्र

maharashtra

Mumbai Municipal Corporation: सर्वच पक्षांचा मुंबई मनपावर विजय मिळवण्याचा दावा! मात्र, काय आहे खरी परिस्थिती; वाचा

By

Published : Jul 31, 2022, 7:31 PM IST

Updated : Jul 31, 2022, 7:42 PM IST

मुंबई महानगरपालिकेवर गेले २५ वर्षे शिवसेनेची सत्ता आहे. गेल्या काही निवडणुकीत पालिकेत भाजपा हा पक्ष मोठ्या प्रमाणात वाढला आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे सारखे पक्ष पालिकेमधून संपण्याच्या मार्गावर आले आहेत. काँग्रसच्या नगरसेवकांची संख्या कमी झाली आहे. तर एकीकडे भाजपाने आपलाच महापौर महापालिकेवर बसवण्याचा संकल्प केला आहे. तसेच, शिवसेनेकडूनही आमचाच महापौर बसेल असा दावा करण्यात आला आहे.

मुंबई मनपा
मुंबई मनपा

मुंबई - मुंबई महानगरपालिकेच्या २००२ पासून २०१७ पर्यंत ५ निवडणुका झाल्या आहेत. या ५ निवडणुकीमध्ये शिवसेना हा एकमेव पक्ष आहे, ज्याचे प्रत्येक निवडणुकीत ७० ते ८० पेक्षा अधिक नगरसेवक निवडून आले आहेत. तर, भाजपाने मागील निवडणुकीत ८२ नगरसेवक निवडून आणून दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला आहे. तर काँग्रेसच्या नगरसेवकांच्या संख्येत कमालीची घट झाली आहे. तर, राष्ट्रवादी काँग्रेस आणि मनसे सारखे पक्ष दोन अंकावरून एक अंकावर आले आहेत. यामुळे येत्या पालिका निवडणुकीत शिवसेना विरुद्ध भाजपा असा थेट सामना बघायला मिळणार आहे.

मागील ५ निवडणुकीचे निकाल काय -२०१७ च्या निवडणुकीत शिवसेनेचे ९७ (अपक्ष, मनसे ६), भाजपा ८२, काँग्रेसचे ३१, राष्ट्रवादी काँग्रेसचे ९, समाजवादी पक्षाचे ६, एमआयएमचे २, तर मनसेचा १ नगरसेवक निवडून आला आहे. २०१२ च्या निवडणुकीत शिवसेनेचे ७५, काँग्रेस ५२, भाजपा ३१, मनसे २८, राष्ट्रवादी १३ नगरसेवक निवडून होते. २००७ मध्ये शिवसेनेचे ८४, काँग्रेस ७५, भाजपा २८, मनसे ७, राष्ट्रवादी १४ नगरसेवक निवडून होते. २००२ मध्ये शिवसेनेचे ९७, काँग्रेस ६१, भाजपा ३५, राष्ट्रवादी १२ नगरसेवक निवडून होते. १९९७ मध्ये शिवसेनेचे १०३, काँग्रेस ४८, भाजपा २६ नगरसेवक निवडून होते.


भाजपाचे "मिशन १३४" -मुंबई महानगरपालिकेत २३६ प्रभाग आहेत. महापालिकेला यंदा १३४ वर्षे होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर १३४ नगरसेवक निवडून आणण्यासाठी मिशन १३४ चा संकल्प केला आहे. बहुमताला लागणाऱ्या ११८ पेक्षा अधिक नगरसेवक निवडून आणण्याचा आणि भाजपचा महापौर बसवण्याचा आमचा प्रयत्न आहे. शिवसेनेच्या सोबत आम्ही निवडणूक लढवू, एकनाथ शिंदे यांचीच खरी शिवसेना आहे. याबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल, अशी माहिती पालिकेतील भाजपचे प्रवक्ते भालचंद्र शिरसाट यांनी दिली आहे.

शिवसेनेचाच महापौर -मुंबईकरांची नाळ शिवसेनेशी जुळली आहे. महाविकास आघाडी सरकार, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, युवा नेते आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मुंबईमध्ये विकास कामे झाली आहेत. या कामांच्या माध्यमातून मुंबईकर पुन्हा शिवसेनेलाच संधी देईल. महापालिकेवर शिवसेनेचाच महापौर बसेल असे माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी सांगितले.

हेही वाचा -MP Sanjay Raut: शिवसेना नेते संजय राऊत अखेर ईडीच्या ताब्यात; शिवसैनिक आक्रमक

Last Updated : Jul 31, 2022, 7:42 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details