औरंगाबाद -औरंगाबाद येथे स्मारकाऐवजी महिला व शिशुसाठी उभारण्यात येणाऱ्या सुसज्ज ४०० खाटांच्या रुग्णालयास गोपीनाथ मुंडे ( Gopinath Munde Name to hospital ) यांचे नाव देण्यात यावे. तसेच महाराष्ट्रात महापुरुषांचे स्मारक शासकीय निधीतुन ( memorials of great men ) उभारण्या ऐवजी त्यांच्या नावाने सर्वसामान्य जनतेसाठी अद्यावत रुग्णालय, शाळा, महाविद्यालय व हॉस्टेल उभारण्याचे निर्देश संबंधितांना द्या. शिवसेना पक्षातील सर्व नेतेमंडळी, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी महापुरुषांचे स्मारक व पुतळ्यांचे बांधकाम लोकवर्गणीतून करण्याचे सुचना देण्याची मागणी खासदार इम्तियाज जलील ( MP Imtiaz Jalil ) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( Chief Minister Uddhav Thackeray ) यांच्याकडे केली आहे.
'पुतळ्यांना विरोध राहणार' :महाराष्ट्रात नव्याने उभारण्यात येणाऱ्या स्मारक व पुतळ्यास माझा विरोध आहे व राहणारच. मी माझ्या मतावर ठाम असून स्मारक व पुतळ्याऐवजी त्या महापुरुष व लोकनेत्यांच्या नावाने सर्वसामान्य जनतेला लाभ मिळेल, असे लोकोपयोगी प्रकल्पास माझा संपुर्ण पाठिंबा असणार असल्याचे मुख्यमंत्री यांना दिलेल्या पत्रात इम्तियाज जलील यांनी सांगितले आहे. महाराष्ट्र राज्यात आजवर अनेक महापुरुष व लोकनेत्यांनी जन्म घेतलेला आहे. महापुरुष व लोकनेते यांनी आपल्या कामातून एक नविन ओळख निर्माण करुन आपले संपूर्ण आयुष्य फक्त सर्वसामान्य जनतेच्या भवितव्यासाठी, महाराष्ट्राच्या सर्वांगिण विकासासाठी पणाला लावले होते. अशा महान महापुरुष व लोकनेते यांचे फक्त स्मारक व पुतळे उभारण्याऐवजी त्यांच्याच नावाने अद्यावत रुग्णालय, शाळा, महाविद्यालय व हॉस्टेल उभारावे हिच या सर्वांना खरी श्रध्दांजली असणार आहे, असेही ते म्हणाले.