महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Oct 29, 2020, 7:32 PM IST

ETV Bharat / business

टाळेबंदीनंतर ग्राहकांकडून लहान व वापरलेल्या कारच्या खरेदीला प्राधान्य ; आघाडीच्या बँकरने 'हे' सांगितले कारण

शालिनी वॉरियर म्हणाल्या, की जवळपास कोविडपूर्वीच्या स्तरावर खर्चाचे प्रमाण आले आहे. तरीही, पैसा खर्च करण्यात खूप फरक पडला आहे. प्रवास, हॉटेलिंग आणि पर्यटन यावरील खर्चाचे प्रमाण खूप कमी आहे.

शालिनी वॉरियर
शालिनी वॉरियर

हैदराबाद-कोविड-१९ मुळे लादलेल्या सुरूवातीच्या लॉकडाऊनच्या दिवसात, किराणा आणि औषधे अशाजीवनावश्यक वस्तुंवर अधिक पैसा खर्च केला जात असताना, भारतीय ग्राहकांच्या खर्चकरण्याच्या प्राधान्यक्रमात महत्वपूर्ण बदल झाला आहे. आता सरकारने अलिकडच्या काही महिन्यांत निर्बंध उठवल्याने ग्राहकांचा ८० ते ९० टक्के खर्च हा कोविड पूर्वीच्या स्तरावर आला आहे. परंतु पूर्वीच्या खरेदीच्या अगदी विपरित, भारतीय ग्राहक आता विषाणुचा धोका कमी होईल अशा वस्तु आणि सेवांवर जास्त खर्च करू लागले आहेत, असे एका वरिष्ठ बँकरने सांगितले.

यंदाच्या मार्चमध्ये, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सार्स-सीओव्ही-२ विषाणुचा समूह संसर्गाला आळा घालण्यासाठी संपूर्ण राष्ट्रव्यापी टाळेबंदी जाहीर केली होती. जगातील ही सर्वात कडक टाळेबंदी आहे, असे तिचे वर्णन वर्णनही करण्यात आले. काही क्षेत्रे वगळता बहुतेक सारे लोक आपापल्या घरातच अडकून पडल्याने, जवळपास सारी आर्थिक हालचाल ठप्प झाली होती. यामुळे भारतीय ग्राहकांच्या विशेषतः मध्यमवर्गातील लोकांच्या खर्च करण्याच्या वर्तनात संपूर्ण बदल घडून आला. आर्थिक अनिश्चिततेच्या काळात लोकांची रोख रक्कम राखून ठेवण्याची प्रवृत्ती असते.

फेडरल बँकेच्या कार्यकारी संचालक शालिनी वॉरियर म्हणाल्या की, टाळेबंदीच्या सुरुवातीच्या काही दिवसात ग्राहकांच्या खर्चाचे प्रमाण खूप कमी झाले होते. जास्तीत जास्त किराणा सामान, औषधे आणि इतर काही मर्यादित उद्दिष्टाच्या वापरासाठी ग्राहक खर्च करत होते. बँकेच्या किरकोळ व्यवसायाच्या प्रमुख असलेल्या वॉरियर असेही म्हणतात की, गेल्या तीन महिन्यात, सरकारने टाळेबंदीचे निर्बंध उठवल्याने ग्राहकांच्या खर्चाच्या प्रमाणात वाढ झाली आहे. अर्थव्यवस्था खुली होण्यास सुरूवात झाली आहे. तसे आपण खर्चाचे प्रमाण वाढल्याचे पाहिले आहे. प्रत्यक्षात, उद्योगाने क्रेडिट आणि डेबिट कार्डवर खर्च करण्याचे प्रमाण जानेवारीच्या तुलनेत एकंदरीत ८० ते ९० टक्के साध्य केले आहे. पुढे त्या म्हणाल्या की, बाजारपेठेत आर्थिक चलनवलन सुरू होणे हे चांगले चिन्ह आहे.

ग्राहकांच्या खर्च करण्याच्या पद्धतीत बदल-

मुंबईस्थित देयक सेवा आणि एटीएम व्यवस्थापन कंपनी इपीएस इंडियाच्या व्यवसाय आणि बँकिंग संवाद कार्यक्रमात शालिनी वॉरियर यांनी ही माहिती दिली. ईटीव्ही भारतने विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना, वॉरियर म्हणाल्या की जवळपास कोविडपूर्वीच्या स्तरावर खर्चाचे प्रमाण आले आहे. तरीही, पैसा खर्च करण्यात खूप फरक पडला आहे. प्रवास, हॉटेलिंग आणि पर्यटन यावरील खर्चाचे प्रमाण खूप कमी आहे. प्रत्यक्षात अगदीच किरकोळ आहे. त्यांची जागा इतर काही जीवनावश्यक वस्तुंवरील खर्चाने घेतली आहे, ज्या वस्तु लोकांना आपल्या घरांसाठी लागतात, यावर खर्च केला जात असल्याचे वॉरियर यांनी नमूद केले.

वैयक्तिक वाहने खरेदी करण्याकडे ग्राहकांचा कल-

शालिनी वॉरियर या आपल्या बँक ग्राहकांच्या खर्चाच्या आकृतीबंधाकडे डेटा विश्लेषण आणि कृत्रिम बुद्धिमत्तेची मदत घेऊन बारकाईने पहात असतात. त्या म्हणाल्या की, लोक अशा वस्तुंवर खर्च करत आहेत ज्या त्यांना कोविड-१९ शी संबंधित धोके टाळण्यासाठी सहाय्य करतील. आम्ही असेही पाहिले आहे की, खरेदीदारांची प्रवृत्ती ही स्वतः बाजारात जाऊन लहान वाहने जशी की लहान कार, वापरलेल्या कार, दुचाकी खरेदी करण्याकडे वाढली आहे. आम्हाला त्यात ग्राहकांची पसंती दिसून आली आहे. सार्वजनिक वाहतुकीपासून असलेल्या साधारण धोक्यामुळे हे असे घडत असावे, असे मला वाटते, असे वॉरियर यांनी ईटीव्ही भारतला सांगितले. वापरलेली कार असो किंवा दुचाकी असली तरीही, वैयक्तिक वाहने खरेदी करण्यामागे दोन कारणे आहेत. पहिले म्हणजे, मेट्रो आणि उपनगरी रेल्वेसारख्या सार्वजनिक परिवहन सेवा आणि बस सेवांना टाळेबंदी निर्बंधांचा जबर फटका बसला आहे. दुसरे, लोक अजूनही कोविड विषाणुच्या अत्युच्च संसर्गजन्य स्वरूपामुळे सार्वजनिक परिवहनसेवेत इतरांबरोबर प्रवास करणे असुरक्षित समजतात. कोरोना विषाणुने देशात आतापर्यंत १ लाख २० हजार तर जगात दहा लाख १७ हजार लोकांचा बळी घेतला आहे.

सणासुदीचा प्रभाव-

भारतीय ग्राहक हे सणासुदीच्या हंगामाच्या सुरूवातीला मोठ्या प्रमाणावर खरेदी करतात. ऑक्टोबरमध्ये सुरू होऊन पुढील वर्षी मार्चपर्यंत सुरू रहातो. या काळात मोठ्या प्रमाणावर भारतीय ग्राहक नवीन वाहने, घरे,सोने आणि चांदी असे मौल्यवान धातू, दागिने आणि कपडे तसेच इतरही अनेक वस्तुंवर पैसा खर्च करतात. कारण हा कालावधी अशी खरेदी आणि गुंतवणुकीसाठी शुभ काळ समजला जातो. सणासुदीचे दिवस असल्याने सर्वजण मागणीत वाढ होण्याची अपेक्षा करत आहोत. अमॅझॉन आणि फ्लिपकार्टसारख्या ई-कॉमर्स कंपन्यांनी उपकरणे, मोबाईल फोन आदी वस्तुंची चांगली विक्री केल्याचे दिसून आल्याचे वॉरियर यांनी सांगितले.

पीएमआय डेटाकडून आर्थिक पुनरूज्जीवनावर शिक्कामोर्तब

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मंगळवारी सांगितले होते की, सणांच्या दिवसात ग्राहकोपयोगी वस्तुंच्या मागणीत वाढ झाली आहे. ज्याचा उपयोग अर्थव्यवस्थेच्या पुनरूज्जीवनासाठी होईल. लंडनस्थित वित्तीय सेवा पुरवठादार कंपनी आयएचएस मार्किटने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात बोलताना सीतारामन म्हणाल्या की, अलिकडेच मागणीत वाढ झाली आहे. त्यामुळे चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत देशाच्या जीडीपीमध्ये २४ टक्के झालेल्या घसरणीचा परिणाम कमी होऊ शकणार आहे. आयएचएस मार्किटच्या पर्चेसिंग मॅनेजर्स निर्देशांक(पीएमआय) यांनी संकलित केलेल्या आकडेवारीनुसार, कारखान्यातून होणारे उत्पादन यंदाच्या सप्टेंबरपासून गेल्या ८ वर्षातील सर्वात वेगाने वाढले आहे. आयएचएस मार्किट समूहाने जगभरातील ४० प्रमुख अर्थव्यवस्थांमधील मोठ्या कंपन्यांच्या वरिष्ठ कार्यकारी अधिकाऱ्यांचे सर्वेक्षण केले आहे. या सर्वेक्षणात कारखान्यांमधील मासिक उत्पादनाची आकडेवारी संकलित केली. आयएचएस मार्किटच्या पीएमआय डेटा हा देशाच्या अर्थव्यवस्थेचा अत्यंत महत्वाचा निर्देशक मानला जातो. आता स्थिती खूपच चांगली असल्याचे दिसत आहे, असेही शालिनी वॉरियर यांनी म्हटले.

कृष्णानंद त्रिपाठी, ईटीव्ही भारत

ABOUT THE AUTHOR

...view details