महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

दुचाकी अपघात झाल्यास 'असा' करावा विमा कंपनीकडे दावा

७० टक्के दुचाकी वाहनांना अपघात विमा नसतो

By

Published : Feb 13, 2019, 4:04 PM IST

दुचाकी विमा

मुंबई - अपघाताच्या घटनेनंतर विमा दावे करण्याची माहिती अनेकांना नसते. प्रत्यक्षात दुचाकी वाहनांसाठी असलेल्या तृतीय पक्षाच्या अपघात विम्याचे अनेक फायदे आहेत. अपघातांची वाढती संख्या पाहता अशा विम्याची माहिती असणे जरुरीचे आहे.

गतवर्षी वाहन उद्योगात दुचाकींनी २.३ कोटी उत्पादन घेऊन विक्रम केला आहे. गतवर्षी २ कोटी दुचाकींची भारतीय बाजारपेठेत विक्री झाली आहे. महागाई आणि कर्जाचे व्याजदर कमी राहिल्याने दुचाकींची मागणी या वर्षात चालूच राहिल असा अंदाज वाहनउद्योगातील तज्ज्ञ व्यक्त करीत आहेत.


रस्ते अपघातांची वाढती संख्या-
दुचाकींची संख्या वाढत असताना रस्ते अपघातांची संख्याही वाढत आहे. रस्त्यावरील अपघातात दुचाकींच्या अपघातांचा ९५ टक्के समावेश आहे. यामधील ७० टक्के दुचाकी वाहनांना अपघात विमा नसतो. गेल्या दहा वर्षात रस्ते अपघातामध्ये मृत्यू पावणाऱ्यांची संख्याही वाढली आहे. दरवर्षी अपघातात १.३ लाख जणांचा मृत्यू होतो.


सरकारने विम्याची वाढविली रक्कम-
सरकारच्या नियमानुसार दुचाकी घेणाऱ्यांना तृतीय पक्षाचा विमा घेणे बंधनकारक आहे. दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्यास अथवा जखमी झाल्यास अपघात विम्यात भरपाई मिळते. केंद्र सरकारने १ जानेवारी २०१९ ला नियमात बदल करून मृत झालेल्या दुचाकीस्वाराला देण्यात येणाऱ्या विम्याच्या रक्कमेत ५ टक्के वाढ केली. त्यामुळे अपघात विमा घेणाऱ्या दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्यास त्याच्या नातेवाईकाला ५ लाख २५ हजार रुपये मिळणार आहेत. तर जखमी झाल्यास मिळणारी रक्कम ही २५ हजारावरून २६ हजार २५० रुपये केली आहे

रस्ते अपघात झाल्यास जखमी होणारा विमाधारक जसा विम्याचा दावा करू शकतो, तसेच जखमी व्यक्तीदेखील वाहनचालकावर आणि विमा कंपनीवर दावा करू शकतो. मात्र अपघात विमा प्राधिकरण भरपाई देण्याबाबत अंतिम निर्णय घेते.


ही घ्या विमा दावा दाखल करताना काळजी-
विम्यासाठी दावा करताना काही गोष्टी दुचाकीस्वाराने लक्षात घ्यायला हव्यात. मालमत्ता अथवा वाहनाचे नुकसान झाल्यास जास्तीत जास्त ७.५ लाख रुपयांची मदत करण्यात येते. त्यामुळे दुसऱ्या व्यक्तीबरोबर अपघात झाल्यास बाकीची रक्कम वाहनचालकाला द्यावी लागते. अपघातात एका व्यक्तीचा मृत्यू झाल्यास त्यासाठीच्या विमा रक्कमेवर कोणतीही मर्यादा नाही. याबाबत किती विमा द्यायचा आहे, हा निर्णय न्यायालय घेते. न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे विमा कंपनी ठरावीक वेळेत विम्याची रक्कम देते.

ही आवश्यक आहेत कागदपत्रे-
जर तुमच्या वाहनाचा अपघात झाल्यास तुम्हाला वैद्यकीय खर्च व उपचारासाठी विम्याचा दावा करता येतो. वाहनाचे नुकसान झाल्यास मान्यताप्राप्त वर्कशॉपमधून नुकसानीचे पूर्ण कागदपत्रे घ्यावी लागतात. मुळ बिले आणि पाहणीचे अहवाल घेऊन किती नुकसान झाले याची कागदपत्रे द्यावी लागतात. सर्व आवश्यक कागदपत्रे दिल्यास तृतीय पक्ष विमा कंपनी तुम्हाला भरपाई देते. तर विमाधारकाचा मृत्यू झाल्यास त्याचे नातेवाईक विम्याचा दावा करू शकतात. या दाव्यात अपघात झालेल्या ठिकाणाच्या कार्यक्षेत्रातील पोलीस स्टेशनमधील एफआयआर महत्त्वाचा असतो. एफआयर घेतल्यानंतर चार्जशीट आणि घटनांच्या नोंदीसह आवश्यक कागदपत्रे विमा कंपनीला द्यावी लागतात. अशा प्रकरणात मोटार विमा दावा प्राधिकरणासारख्या न्यायालयात विम्याचा दावा करण्यासाठी वकीलाची मदत घेणे आवश्यक असते. दोन्ही पक्षांची बाजू, कागदपत्रे पाहून न्यायालय विमा देण्याबाबत अथवा रकमेबाबत निर्णय घेते.

ABOUT THE AUTHOR

...view details