महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / briefs

जमिनीवरुन होणाऱ्या कालव्यांसाठी सहकार्य करा, बाळासाहेब थोरातांचे अकोलेकरांना आवाहन

गेल्या पाच वर्षाच्या काळात निळवंडेच्या कालव्यांची कामे पुर्णपणे ठप्प आहेत. केंद्राचा निधी मिळविण्यासाठी अनेक बाबींची पूर्तता बाकी आहे, अजूनही बळीराजा योजनेत या प्रकल्पाचा समावेश झालेला नाही. आता तरी या प्रकल्पाच्या मार्गातील अडचणी सुटाव्यात, ही लाभक्षेत्रातील शेतकर्‍यांची न्याय्य मागणी आहे.

By

Published : Jun 7, 2019, 5:55 PM IST

बाळासाहेब थोरात

अहमदनगर - पिढ्यानपिढ्या पाण्यापासून वंचित असलेल्या दुष्काळी भागाला लवकरात लवकर पाणी मिळावे, यासाठी निळवंडे प्रकल्पाच्या शून्य ते 28 किमी दरम्यान पारंपरिक पद्धतीने जमिनीवरील कालवे बांधण्यात येणार आहेत. त्यासाठी अकोल्यातील जनतेने सहकार्य करावे, असे आवाहन मा.महसूलमंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी अकोलेतील जनतेला केले आहे.

निळवंडे प्रकल्प पूर्ण करण्यासाठी अकोलेतील नेतृत्वाने आणि जनतेने आजपर्यंत सहकार्य केले आहे, तथापी आता होणारी अडवणूक योग्य नाही. केंद्रीय जलसंपदा मंत्री नितीन गडकरी यांनी, ऑगस्ट 2018 मध्ये संसदेत स्पष्टपणे भूमिगत कालवे करणे शक्य नसल्याचे सांगितले आहे, आर्थिक दृष्ट्या भूमिगत कालवे परवडणारे नाही, शिवाय जमिनीवरूनच कालव्यांना शासकीय मंजुरी मिळाली आहे. अशा शब्दात, गडकरी यांनी पारंपरिक पद्धतीनेच कालवे होणार हे स्पष्ट केले आहे. शासनाच्या भूमिकेत अद्यापतरी बदल झालेला नाही, त्यामुळे अकोलेतील जनतेने कालव्यांच्या कामांना विरोध करू नये, असे थोरात म्हणाले.


निळवंडे कालव्यांची कामे शुन्य ते 28 किलोमीटर दरम्यान प्रथम सुरू व्हावेत ही लाभक्षेत्रातील शेतकर्‍यांची मागणी आहे. गेल्या पाच वर्षांपासून हे काम पूर्णत: ठप्प आहे. सन 2014 अखेर निळवंडे धरण पूर्ण झाले होते. कालव्यांसाठीचे मोठमोठ्या बोगद्यांची कामे पुर्ण करुन दुष्काळी पट्ट्याातील कालवे, चार्‍या आणि कामे काही प्रमाणात झाली होती. शिवाय शून्य ते 28 किलोमीटर दरम्यान कालव्यांसाठी चे भूसंपादन तत्कालीन सरकारने पूर्ण केले आहे. याशिवाय केंद्रीय योजनेत समावेश व्हावा यासाठी प्रस्तावही काँग्रेस आघाडी सरकारने करून ठेवला होता.

मात्र मागील पाच वर्षाच्या काळात निळवंडेच्या कालव्यांची कामे पुर्णपणे ठप्प आहेत. केंद्राचा निधी मिळविण्यासाठी अनेक बाबींची पूर्तता बाकी आहे, अजूनही बळीराजा योजनेत या प्रकल्पाचा समावेश झालेला नाही. अशा विविध कारणांमुळे मागील पाच वर्षात कालव्यांची कोणतीही कामे होवू शकली नाही. त्यामुळे लाभक्षेत्रातील गावांचे झालेले नुकसान भरून निघणार नाही. मात्र आता तरी या प्रकल्पाच्या मार्गातील अडचणी सुटाव्यात, ही लाभक्षेत्रातील शेतकर्‍यांची न्याय्य मागणी आहे.

अकोले तालुक्यातील जनतेला मी आवाहन करतो की, दुष्काळी भागातील जनतेच्या भावनांचा आदर करून हे कालवे पारंपारिक पद्धतीने जमिनीवरूनच करून द्यावे. त्यामुळे दुष्काळी भागातील जनतेची अनेक वर्षांची पाण्याची प्रतीक्षा संपणार आहे, त्यामुळे वाद थांबवून सामोपचाराने कालव्यांच्या कामांना सहकार्य करावे, असेही आ. बाळासाहेब थोरात म्हणाले.

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details