नवी दिल्ली/ग्रेटर नोएडा :सीमा हैदरला चित्रपटात काम करण्याची ऑफर देणाऱ्या प्रॉडक्शन हाऊसच्या निर्माता आणि दिग्दर्शकाची टीम बुधवारी सीमाच्या घरी पोहोचली. या दरम्यान दिग्दर्शकाने सीमाची ऑडिशन घेतली आणि तिला चित्रपटातील भूमिकेबद्दल सांगितले. या प्रोजेक्टबाबत सीमा खूपच उत्साहित दिसत होती. विशेष म्हणजे, चित्रपटात सीमाला रॉ एजंटची भूमिका देण्यात येणार आहे. हा चित्रपट राजस्थानच्या उदयपूरमध्ये झालेल्या कन्हैया लाल साहूच्या हत्येच्या घटनेवर आधारित आहे.
रॉ एजंटच्या भूमिकेची ऑफर : दिग्दर्शक अमित जानी सीमाच्या घरी पोहोचले आणि त्यांनी सीमाला भगवी शाल पांघरली. या दरम्यान चित्रपटाच्या संपूर्ण युनिटने सीमाच्या कुटुंबीयांची भेट घेतली. दिग्दर्शक जयंत सिन्हा आणि भरत सिंह यांनी सीमाची ऑडिशन घेतली आणि तिला भूमिकेसाठी निवडले. '2022 मध्ये उदयपूरमध्ये राहणाऱ्या कन्हैया लाल साहू या टेलरची हत्या करण्यात आली होती. त्याच्या हत्येचा तपास एनआयएकडे सोपवण्यात आला. त्यानंतर या प्रकरणात दोन पाकिस्तानींसह 11 जणांविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. यावर आता 'द टेलर मर्डर स्टोरी' नावाने चित्रपट बनवला जात आहे. सीमाला या चित्रपटात रॉ एजंटच्या भूमिकेची ऑफर देण्यात आली, जी तिने स्वीकारली', असे अमित जानी यांनी सांगितले.
सीमाला क्लीन चिट मिळाल्यानंतर कामाला सुरुवात : अमित जानी सीमा हैदर प्रकरणी पोलीस आणि एटीएसच्या अहवालाची वाट पाहत आहेत. एटीएस आणि पोलिसांसह अन्य तपास यंत्रणांचा अहवाल सीमाला निर्दोष घोषित करताच, चित्रपटाची निर्मिती सुरू केली जाणार आहे. 'मी या चित्रपटासाठी तयार असून क्लीन चिट मिळाल्यानंतर कामाला सुरुवात करेल', असे सीमाने सांगितले.
सीमा हैदर पाकिस्तानी गुप्तहेर असल्याचा संशय : सीमा हैदर सचिनवरील प्रेमापोटी पाकिस्तानातून अवैधरित्या भारतात आली होती. सध्या सीमा आणि तिची चार मुले सचिन मीना यांच्या घरी राहत आहेत. सीमाला सध्या न्यायालयाकडून सशर्त जामीन मिळाला आहे. नोएडा पोलीस, यूपी एटीएस आणि केंद्रीय सुरक्षा एजन्सी सचिनचे वडील नेत्रपाल आणि त्याच्या संपूर्ण कुटुंबाची चौकशी करत आहेत. एजन्सीला सीमा हैदर ही पाकिस्तानी गुप्तहेर असल्याचा संशय आहे. तपासामुळे कुटुंबातील एकाही सदस्याला घराबाहेर काम करता येत नसल्याने कुटुंबावर सध्या आर्थिक संकट कोसळले आहे.
हेही वाचा :
- Seema Haider : सीमा हैदरला चक्क चित्रपटात भूमिकेची ऑफर, जाणून घ्या कोण देतय संधी
- Seema Haider : 'अदनान सामीला नागरिकत्व दिले, सीमा हैदरला का नाही?', सीमाच्या वकिलांचा सवाल
- Seema Haider Interview : तपास पूर्ण होताच नागरिकत्व घेणार आणि थाटामाटात लग्न करणार; सीमा गुलाम हैदरशी खास बातचीत