नवी दिल्ली - विरोधी पक्षाच्या नेत्यांवर सरकारकडून करण्यात येत असलेल्या ईडीच्या चौकशीवरुन काँग्रेस नेते राहुल गांधींनी भाजप सरकारवर टीका केली आहे. विरोधी पक्षातील नेते शरद पवारांना विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सरकारने लक्ष्य केले आहे. यामधून भाजप सरकारचा संधीसाधूपणा आणि खुनशीपणा दिसून येतो, असे गांधी म्हणाले आहेत. ही टीका राज्यातील आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर झाल्याचे गांधी म्हणाले.
महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेतील आर्थिक गैरव्यवहार प्रकरण सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर गुन्हा दाखल केला. यामध्ये मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्याखाली या प्रकरणाची नोंद करण्यात आली असून, अजित पवार यांच्या नावाचा समावेश आहे. यानंतर संपूर्ण राज्यभरात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी निदर्शने केली. सरकारद्वारे करण्यात येणारी ही कारवाई सुडबुदद्धीने करण्यात येत आहे, असे राहुल गांधी म्हणाले.