मुंबई Uddhav Thackeray : महाराष्ट्रात शिंदे सरकार स्थापन झाल्यानंतर कायदा आणि सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजल्याचा आरोप विरोधी पक्ष वारंवार करतात. यासाठी गृहमंत्री जबाबदार असल्याचा आरोप करत विरोधकांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे. शनिवारी एका पत्रकार परिषदेत बोलताना, महाराष्ट्रातील सरकार लवकरात लवकर बरखास्त करून राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी उद्धव ठाकरे यांनी केली. तसेच आपल्या राज्याला मनोरुग्ण गृहमंत्री लाभलाय का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
महाराष्ट्रात गुंडांचा हैदोस : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात गुंडांचा हैदोस सुरू आहे. यापूर्वी दोन गॅन्गमध्ये गॅन्गवॉर होता, मात्र आता सरकारमध्ये गॅन्गवॉर असल्याचा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला. "गेल्या दीड वर्षापासून सरकारच्या आश्रयाखाली गुंडगिरी सुरू आहे. गुंडांसोबत सरकारमधील मंत्र्यांचे फोटो आहेत. अभिषेक घोसाळकर प्रकरण दिसतं तितकं सोपं नाही", असं उद्धव ठाकरे म्हणाले. त्यांनी या हत्या प्रकरणावर अनेक सवाल उपस्थित केले आहेत.
गुंड मॉरीसनं आत्महत्या का केली : "घोसाळकर यांची हत्या झाली त्यावेळी फेसबुक लाईव्ह मध्ये कोणी गोळ्या घातल्या हे दिसत नाही. मॉरिसजवळ परवानाधारक शस्त्र नव्हतं. त्याच्या बॉडीगार्डच्या शस्त्रातून गोळ्या झाडण्यात आल्या. गोळ्या मॉरीसनं झाडल्या की आणखी कोणी झाडल्या? दोघांनाही मारण्याची सुपारी कोणी दिली होती का? अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळी झाडणाऱ्या गुंड मॉरीसनं आत्महत्या का केली?", असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला. "राज्यातील ही परिस्थिती पाहता राज्य सरकार बरखास्त करून तत्काळ राष्ट्रपती राजवट लागू करावी आणि निवडणुका घ्यावा", अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली आहे.
राज्याला मनोरुग्ण गृहमंत्री लाभला आहे का : गोळीबाराच्या घटनेवरून उद्धव ठाकरे यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा खरपूस समाचार घेतला. "आपण यापूर्वी त्यांना कलंक, फडतूस म्हणायचो. आता माझ्याकडे शब्द शिल्लक नाही. फडतूस, कलंक अतिशय सौम्य शब्द झाले. फडणवीस यांची मानसिक तपासणी करावी की काय, असं वाटत आहे. आपल्या राज्याला मनोरुग्ण गृहमंत्री लाभला आहे का?", असा घणाघात त्यांनी केला.
हे वाचलंत का :