मुंबई Jula Tunnel : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं पूर्व आणि पश्चिम उपनगरांना रस्ते मार्गानं जोडण्याच्या उद्देशानं महत्वाकांक्षी गोरेगाव-मुलुंड लिंक रोड प्रकल्प घेण्यात आला आहे. सुमारे 12.20 किलोमीटर लांबीच्या या संपूर्ण प्रकल्पामुळं पूर्व आणि पश्चिम उपनगरांदरम्यान प्रवासाची वेळ 75 मिनिटांवरुन 25 मिनिटांवर येणार असल्याचा दावा पालिकेनं केला आहे. या प्रकल्पाच्या तिसऱ्या टप्प्याच्या अंतर्गत संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाखालून प्रत्येकी 4.7 किलोमीटर अंतराच्या जुळा बोगद्याची निर्मिती करण्यात येणार असल्याचं पालिकेनं म्हटलं आहे.
कसा असेल बोगदा : याबाबत अधिक माहिती अशी की, गोरेगाव-मुलुंड लिंक रोड प्रकल्पाच्या तिसऱ्या टप्प्या अंतर्गत बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाखालून प्रत्येकी 4.7 किलोमीटर लांब आणि 45.70 मीटर रुंदीचा जुळा बोगदा बनवण्यात येणार आहे. लिंक रोड आणि अन्य बाबींसह तिसऱ्या टप्प्यातील मार्गाची एकूण लांबी 6.65 किलोमीटर असेल. हा जुळा बोगदा जमिनीखाली 20 ते 160 मीटर खोल भागात असणार आहे. प्रत्येकी 300 मीटर अंतरावर दोन्ही बोगदे एकमेकांशी जोडले जातील. सुमारे 14.2 मीटर व्यासाचा बोगदा खोदण्याच्या संयंत्रानं बोगद्याचं खोदकाम होणार असल्याची माहिती पालिकेनं दिली आहे.
बोगद्यात अत्याधुनिक सुविधा : या बोगद्यामध्ये अत्याधुनिक प्रकाशव्यवस्था, वायुविजन प्रणाली, अग्निरोधक यंत्रणा, सीसीटीव्ही, बोगद्याच्या दोन्ही दिशांना नियंत्रण कक्ष आदी सुविधांचा समावेश असेल. सोबतच पर्जन्य जलवाहिनी, भविष्यातील पाणीपुरवठ्यासाठी लागणाऱ्या संभाव्य जलवाहिन्या आदी उपयोगिता वाहिन्यांची बोगद्याच्या खाली व्यवस्था केली जाणार आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील वनस्पती, प्राणी तसंच आरे, विहार व तुळशी तलाव यांचं क्षेत्र बाधित न करता आणि त्यांना हानी न पोहोचवता बोगद्याचं बांधकाम होणार असल्याचे पालिकेनं म्हटलं आहे. पालिकेच्या माहितीनुसार, या प्रकल्पासाठी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामध्ये भूसंपादन करण्यात आलेलं नाही. हा भुयारी मार्ग राष्ट्रीय उद्यानाखालून जाणार असल्यानं प्राण्यांच्या सुरक्षित विहारासाठी विशेष रस्ता देखील बांधण्यात येणार आहे. या प्रकल्पामुळं कार्बन उत्सर्जनात दरवर्षी सुमारे 22 हजार 400 टनांनी घट होणार असल्याचा दावा पालिकेनं केला आहे. सोबतच या प्रकल्पामुळं मुंबईकरांच्या प्रवासाच्या वेळेत आणि इंधनाचीही बचत होणार आहे. या बोगद्याच्या निर्मितीसाठी 6301.08 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.
सद्यास्थिती कशी : जुळा बोगद्याचं काम पूर्णत्वास येण्याचा अंदाजित कालावधी ऑक्टोबर 2028 पर्यंत अपेक्षित आहे. प्रकल्पाच्या सद्यस्थितीत एकूण स्टेशन सर्वेक्षण, माती तपासणीची कामं, तात्पुरते रस्ते वळविण्याचं काम तसंच प्राथमिक डिझाइनची कामं प्रगतिपथावर आहेत. या बोगदा प्रकल्पामुळं विस्थापित होणाऱ्या निवासी आणि व्यावसायिक प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाकरीता, तळमजला, 23 मजल्यांच्या 7 इमारती आणि तळमजला 3 मजल्यांची बाजार इमारतीची कामं देखील प्रगतिपथावर असल्याचं पालिकेनं म्हटलं आहे.