ठाणे School girls molested: शाळेतील सहलीला गेलेल्या विद्यार्थिंनींचा विनयभंग झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी बुधवारी (दि. 21) रोजी कापूरबावडी पोलीस ठाण्यात खासगी बस अटेंडन्ट जावेद मोहम्मद नवी खानवर बाल लैंगिक अत्याचार संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुलींना चुकीच्या पद्धतीनं स्पर्श : पीडित मुलगी एका शाळेत शिकत आहे. घटनेच्या दिवशी शाळेच्या वतीनं घाटकोपर येथे पिकनिक गेली होती. एका कंपनीच्या बसमधून शालेय विद्यार्थांना सहलीला नेण्यात आलं होतं. या बसमध्ये आरोपी जावेद मोहम्मद नवी खान (27) रा. भगतसिंग नं ३, लिंक रोड गोरेगाव (प) मुंबई यानं मुलींच्या अंगाला चुकीच्या पद्धतीनं स्पर्श केला. याबाब मुलींनी सायंकाळी त्यांच्या पालकांना घडलेला प्रकार सांगितला.
पालकांचा मोठा उद्रेक : यानंतर पालकांनी या घटनेबाबत शाळा प्रशासनाला जाब विचारला. तसंच पालकांनी स्वत: खासगी बस अटेंडन्ट जावेद मोहम्मद नवी खान याच्याविरुद्ध कापूरबावडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पालकांनी संताप व्यक्त केल्यानंतर कापूरबावडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक वाय.एस. आव्हाड यांनी पालकांची भेट घेऊन गुन्हा दाखल केला. याप्रकरणी कापूरबावडी पोलीस अधिक तपास करत आहेत.
- शाळा शिक्षकांवर करणार कारवाई : या संपूर्ण प्रकारानंतर पालकांचा उद्रेक लक्षात घेता, शाळा व्यवस्थापनानं यासंदर्भात हलगर्जीपणा करणाऱ्या शिक्षकांवर निलंबनाची कारवाई करणार असल्याचं म्हटलं आहे. मात्र, पालकांनी शाळा व्यवस्थापनावरदेखील गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली आहे.
राष्ट्रवादी, मनसे आक्रमक : ठाण्यातील शाळेत विद्यार्थिंनींच्या विनयभंग प्रकरणानंतर , राष्ट्रवादी पक्ष शरदचंद्र पवार गटाच्या महिला कार्यकर्त्या आक्रमक झाल्याचं दिसून आलं. या प्रकरणी महिला कार्यकर्त्यांनी कापूरबावडी पोलीस ठाण्यात गोंधळ घालत कठोर कारवाईची मागणी केली. यावेळी पोलिसांना महिलांना रोखणं कठीण झालं होतं. यांच्यासोबत ठाण्यातील मनसेचे नेते अविनाश जाधव यांनीदेखील शाळा प्रशासनाला सकाळपासूनच धारेवर धरलंय. त्यांनीदेखील या संदर्भात कठोर कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिलेला आहे.
हे वाचलंत का :