मुंबई Mumbai Prohibition order : वाकोला येथे पोलिसांनी धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका व्यक्तीवर गुन्हा दाखल केला. आरोपीनं मीरा रोडमध्ये घडलेल्या घटनेचा संदर्भ देत सांताक्रूझ पूर्व येथेही मीरा रोडसारखी घटना घडवून आणण्यास मागेपुढे पाहणार नाही, अशी मंदिरातील मंडळीला धमकी दिली. फिर्यादी राज यादव यांनी वाकोला पोलिसांना सांगितले की, आरोपी हा धार्मिक समारंभ सुरू असलेल्या मंदिराबाहेर येऊन सिगारेटचा धूर मंदिराच्या दिशेने उडवत होता. त्याला प्रतिकार केला असता त्यानं अशी धमकी दिली. बंदोबस्ताच्या ड्युटीवर असलेले पोलीस अधिकारी तत्काळ घटनास्थळी पोहोचले. त्यांनी आरोपीला अटक केली.
अयोग्य गोष्टी सांगणारी सोशल मीडिया पोस्ट : जुहू पोलिसांनी अंधेरी पश्चिमेकडील इर्ला गावात एका खासगी निवासस्थानाबाहेर असलेल्या ख्रिश्चन धर्मातील पवित्र चिन्हाची विटंबना केल्याप्रकरणी एका व्यक्तीवर गुन्हा दाखल केला. ख्रिश्चन समुदायातील काही सदस्यांना आरोपी धार्मिक पवित्र चिन्हाबरोबर नाचताना दिसला होता. आरोपीवर भारतीय दंड संविधान कलम 295 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. स्थानिक शीख समुदायाच्या सदस्यांनी शीख धर्मगुरूंबद्दल चुकीची माहिती सांगणारी सोशल मीडिया पोस्ट पाहिल्यानंतर अँटॉप हिल पोलिसांनी सायन कोळीवाडा रहिवासी एका व्यक्तीवर गुन्हा दाखल केला.
कारचालकाच्या दिशेने दगड फेकला : अंधेरीतील आणखी एका घटनेत, मिल्लत नगर येथे सोमवारी पहाटे परिस्थिती अधिक तणावपूर्ण होण्याची शक्यता होती. जय श्री रामचा जयघोष करत आणि भगवे झेंडे घेऊन कार आणि बाईकवरून जाणाऱ्यांचा ताफा मिल्लत नगर सीएचएसमधून जाणाऱ्या रस्त्यावर घुसला. कारचा ड्रायव्हर चुकून कॉलनीच्या आतल्या रस्त्यावर आला. सोसायटीच्या आवारात प्रवेश करताच घोषणा देत बाईकवरून आलेल्या समूहानं कारची पुढची काच फोडली. त्याला विरोध केला असता कार चालकाच्या दिशेनं दगड आणि काचेच्या बॉटल्स फेकण्यात आली. ओशिवरा पोलिसांनी पीडितच्या तक्रारीच्या आधारे वीस अज्ञातांवर गुन्हा दाखल केला.
सीसीटीव्ही फुटेज तपासले : रविवारी रात्री भगवे झेंडे एका सोसायटी परिसरात रस्त्यावर लावण्यात आले होते. मात्र, सोमवारी सकाळी हे झेंडे गायब झाले होते. तक्रारदार महादेव चंद्रगोपाल यांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले असता त्यांना एक व्यक्ती झेंडे काढून रस्त्यावर फेकताना दिसला. चंद्रगोपाल यांची तक्रारी आणि फुटेजच्या आधारे मालवणी पोलिसांनी आरोपींवर गुन्हा दाखल केला.
- धार्मिक तेढ निर्माण होणाऱ्या किंवा चिथावणीखोर पोस्ट, व्हिडिओ या सोशल मीडियावर पसरवू नये. अशा पोस्ट पसरविणाऱ्या व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचा इशारा यापूर्वीच पोलिसांनी दिला आहे. कोणत्याही अफवांना बळी पडू नये. शांतता व धार्मिक सलोखा ठेवावा, असे पोलिसांकडून आवाहन करण्यात आलेलं आहे.
भगवान रामाचे चित्र असलेले झेंडे हटवले : कायदा आणि सुव्यवस्था राखण्याच्या उद्देशाने मुंबई पोलीस नियमितपणे प्रतिबंधात्मक आदेश जारी करत असतानाच, त्यांनी मंगळवारी नवीन आदेश जारी केला. पोलीस उपायुक्त (ऑपरेशन) विशाल ठाकूर यांनी जारी केलेल्या आदेशात म्हटले आहे की, '' शांतता भंग आणि सार्वजनिक शांतता भंग होण्याची शक्यता आहे. 23 जानेवारी ते 6 फेब्रुवारी या कालावधीत कोणत्याही प्रकारचे अनुचित प्रकार घडू नये म्हणून पाच किंवा त्याहून अधिक लोकांच्या एकत्र येण्यावर निर्बंध घातले आहेत. मिरवणूका आणि लाऊड स्पीकरवर बंदी घालण्यात आली''. तसंच, भोईवाडा पोलिसांनी परळमध्ये अशाच एका घटनेत तिघांवर गुन्हा दाखल केला. सिद्धी अहमद को-ऑपरेटिव्ह हाउसिंग सोसायटीमध्ये भगवान रामाचे चित्र असलेले झेंडे इमारतीच्या सचिवानं हटवले होते. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.
हेही वाचा :
1 मीरा रोडवर बुलडोझर चालला! हाणामारीच्या घटनेनंतर बेकायदेशीर बांधकामावर प्रशासनाची कारवाई
2 आमदार रोहित पवार आज ईडी चौकशीला सामोरं जाणार! राष्ट्रवादी शक्तिप्रदर्शन करण्याची शक्यता
3 मुख्यमंत्री दोन दिवसासांठी मूळ गावी, गावकऱ्यांकडून जंगी स्वागत; दौऱ्याचं कारण काय?