नागपूर Nagpur Heat News : नागपूरसह संपूर्ण विदर्भात उष्णतेचा हाहाकार उडालेला आहे. तापमानाचा पारा ४५ अंशाच्या पुढं गेल्यानं उष्मघाताच्या रुग्णांची संख्या सुद्धा वाढलीय. नागपुरात चार दिवसात दहा जणांचा मृत्यू झालाय. या दहाही जणांचा मृत्यू उष्माघातानं झालाय असा दुजोरा आरोग्य विभागाकडून किंवा मनपाकडून मिळालेला नसला, तरी सर्व दहाही जण रस्त्यावर राहणारे भिक्षेकरी किंवा बेघर होते. त्यांचे मृतदेह रस्त्यावर आढळले आहेत. त्यामुळे त्यांचा उष्माघातामुळं मृत्यू झाला असावा, असा संशय व्यक्त केला जात आहे. उन्हाचा तडाखा वाढत असल्यामुळं अश्या मृत्यूंची संख्या वाढण्याची भीती निर्माण झालीय.
गेल्या चार दिवसात मृत्यू झालेल्यांची माहिती
१) सोमवारी कमाल चौका जवळच्या परिसरात एका ३५ वर्षीय तरुणाचा मृतदेह रस्त्यावर आढळून आला. उन्हामुळे चक्कर येऊन तो बेशुद्ध पडला, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
२) मंगळवारी सीताबर्डी परिसरातील लोखंडी पुलाजवळ एक ४५ वर्षीय व्यक्ती मृतावस्थेत आढळून आला.
३) मंगळवारी पाचपावली परिसरातील यशोदीप कॉलनी जवळ रात्री साडेदहा वाजता सुमारे ५० वर्ष वयाचा एक पुरुष मृतावस्थेत आढळून आला..
४) तर मंगळवारी कळमना मार्केट जवळच्या शिवम हॉटेल जवळ एक ५० वर्षीय व्यक्ती बेशुद्ध अवस्थेत आढळून आला. परिसरातील लोकांनी त्याला सरकारी रुग्णालयात दाखल केलं. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
५) मंगळवारी रात्री दहा वाजताच्या सुमारास सदर पोलीस स्टेशन अंतर्गत मेश्राम चौका जवळच्या फूटपाथवर ६० वर्षीय वृद्धाचा मृतदेह आढळून आला..
६) बुधवारी दिघोरी उड्डाणपुलाखाली सकाळी साडे सहा वाजताच्या सुमारास ३१ वर्षीय युवक मृतावस्थेत आढळून आला.
७) धंतोली परिसरातील मेहाडिया भवनजवळ सकाळी दहा वाजता एक ५० वर्षीय व्यक्ती मृत आढळून आला.
८) २९ मे रोजी सकाळी साडेआठ वाजता शताब्दी चौक जवळच्या फायर ब्रिगेड ऑफिसच्या भिंती लगत ४५ वर्षीय व्यक्ती मृत आढळून आला.
९) कळमना पोलीस स्टेशनच्या हद्दीतील कीर्ती रेस्टॉरंट समोर ४० वर्षीय व्यक्ती बेशुद्ध अवस्थेत आढळून आला, त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आलं असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं.
१०) नवीन कामठी पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही एक ५५ वर्षे व्यक्ती बेशुद्ध अवस्थेत आढळून आले, त्यांना देखील डॉक्टरांनी मृत घोषित केलं.
या सर्व मृत्यू प्रकरणासंदर्भात अजूनही आरोग्य विभागाकडून किंवा महापालिकेकडून त्यांचा मृत्यू उष्माघातानंच झालाय असा दुजोरा दिलेला नाही.
उष्माघातापासून बचावासाठी मनपाची यंत्रणा कार्यरत : नागपूरसह देशात विविध ठिकाणी तापमान वाढत आहे. नागपूरमध्ये सुद्धा ४५ अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आले आहे. वाढत्या तापमानामुळं उद्भवत असलेल्या उष्माघाताच्या धोक्यापासून बचावासाठी नागपूर महानगरपालिकेची यंत्रणा विविध टप्प्यांवर कार्यरत असल्याचा दावा करण्यात आलाय. शहरातील ९ शासकीय आणि मनपा रुग्णालयांमध्ये ‘कोल्ड वॉर्ड’ची निर्मिती करण्यात आलीय. नागरिकांसाठी मनपाची उद्यानं दुपारीही सुरुच ठेवण्यात येत आहेत. मनपाच्या समाज विकास विभागातर्फे शहरातील वाढते तापमान लक्षात घेता बेघर नागरिकांचे सुरक्षेच्या दृष्टीनं प्रतिबंधात्मक उपाययोजना अंतर्गत समाज विकास विभागामार्फत शहरातील विविध भागात बेघरांचा शोध घेउन त्यांना निवारा केंद्रात आश्रय देण्यात आलाय. एप्रिल २०२४ पासून आतापर्यंत १११ पेक्षा जास्त बेघर नागरिकांना निवारा केंद्रात आश्रय देण्यात आला. सध्यस्थितीत सर्व सहा बेघर निवारा केंद्रात एकुण 354 नागरिक राहात आहेत. मनपाची १६३ उद्यानं दुपारच्या वेळेत सुरू ठेवण्यात येत आहेत, तर ३५०च्या वर ठिकाणी पाणपोईची व्यवस्था करण्यात आलीय.
नागरिकांनो 'ही' काळजी घ्या : नागरिकांनी कामाशिवाय उन्हात बाहेर जाणं टाळावं. उन्हात जाण्याची वेळ आल्यास योग्य खबरदारी घेतली जावी. भरपूर पाणी प्यावं, हलके, पातळ आणि सच्छिद्र कपडे वापरावेत. बाहेर जाताना गॉगल्स, छत्री किंवा हॅट, बूट किंवा चप्पलचा वापर करावा. प्रवासादरम्यान पाण्याची बाटली सोबत ठेवावी. उन्हात काम करताना हॅट किंवा छत्रीचा वापर करावा. शरीरात पाण्याचं प्रमाण कमी होत असल्यास लिंबूपाणी, ताक आदी पेय नियमीत प्यावं. घर थंड ठेवण्यासाठी ओलसर पडदे, पंखा, कुलर आदींचा वापर करावा. लहान मुलं किंवा पाळीव प्राण्यांना बंद असलेल्या आणि पार्क केलेल्या वाहनात ठेवू नका. घराची दारे आणि खिडक्या उघड्या ठेवाव्यात. मद्य, चहा, कॉफी, सॉफ्टड्रिंक्स ही पेय टाळावी. शिळं आणि उच्च प्रथिनं असलेलं अन्न खाणं टाळावं.
हेही वाचा
- मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना नाना पटोलेंचं खोचक प्रत्युत्तर; म्हणाले, 'भविष्यात तुम्हाला शेतीच...' - Nana patole
- संतापजनक! महिलेला कारखाली चिरडणाऱ्याला पोलिसांनी केवळ नोटीस देऊन सोडलं - Nagpur Hit and Run
- एका हाताने टाळी वाजवण्याचा अंध तरुणानं केला पराक्रम, इंडीयाज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद - Rahul Petare can clap by one hand
- लातूरात गुटख्याच्या गोडाऊनवर छापा, 3 कोटी 5 लाखांचा मुद्देमाल जप्त - Gutkha Seized In Latur