नाशिक Shravan Somvar 2024 : बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर महादेव मंदिरात श्रावण महिन्यात भाविकांची मोठी गर्दी असते. अशात त्र्यंबकेश्वर स्थित असलेल्या ब्रह्मगिरी पर्वताला प्रदक्षिणा मारल्यास विशेष फलप्राप्ती होत असल्याने दरवर्षी राज्यभरातून लाखो भाविक त्रंबकेश्वरमध्ये दाखल होतात. या अनुषंगाने एसटी महामंडळाकडून देखील नाशिकहून श्रावणाच्या तिसऱ्या सोमवारी 270 अतिरिक्त बसेसचे नियोजन करण्यात आले आहे.
तिसऱ्या श्रावण सोमवारी भाविकांची गर्दी : बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर महादेव मंदिर, कुशावर्त परिसरात श्रावण महिन्यात भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी होत असते. श्रावण महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी ही गर्दी उच्चांक गाठते. राज्यभरातून दीड ते दोन लाख भाविक त्रंबकेश्वरमध्ये दाखल होतात. तिसऱ्या सोमवारी ब्रह्मगिरी पर्वताच्या प्रदक्षिणेला विशेष महत्त्व आहे. भाविकांची गर्दी लक्षात घेता या दिवशी खासगी वाहनांना त्र्यंबकेश्वरमध्ये प्रवेश बंदी असते. राज्य परिवहन महामंडळाच्या वतीनं मागील दोन सोमवारचा अनुभव घेता तसंच तिसऱ्या श्रावणी सोमवारी होणारी गर्दी लक्षात घेता नाशिकहून 270 जादा बसेसचं नियोजन करण्यात आलं आहे. नाशिकहून प्रत्येक पाच मिनिटाला त्र्यंबकेश्वरच्या दिशेनं बस मार्गस्थ होणार आहेत.
ब्रह्मगिरी प्रदक्षिणा महत्त्व : त्र्यंबकेश्वर येथील ब्रह्मगिरी प्रदक्षिणा वर्षभरात केव्हाही केली जाते. मात्र, गेल्या काही वर्षपासून श्रावण महिन्यातील तिसऱ्या श्रावणी सोमवारी ही प्रदक्षिणा केल्यास अधिक फलप्राप्ती होते, असं मानतात. त्यामुळं लाखो भाविक या दिवशी ब्रह्मगिरी प्रदक्षिणा करण्यासाठी त्र्यंबकेश्वर नगरीत दाखल होतात. बहुतांश भाविक रविवारी रात्री बारा वाजेनंतर कुशावर्त कुंडावर स्नान करून त्र्यंबक राजाचे दर्शन करून ब्रह्मगिरी प्रदक्षिणेस सुरुवात करतात. 20 किलोमीटरच्या फेरी दरम्यान कित्येक अनेक तीर्थ दिसतात. त्यातील बहुतेक तीर्थ आजकालच्या ओघात लुप्त झालेत. भगवान भोलेनाथाचं नामस्मरण करत भाविक ही प्रदक्षिणा पूर्ण करतात. प्रदक्षिणा मार्गावर असलेल्या सरस्वती तीर्थ, रामतीर्थ, नागातीर्थ, निर्मल तीर्थ, प्रयाग तीर्थ आदी मंदिरात भाविक नतमस्तक होतात. तसंच डोंगर, दऱ्या निसर्गरम्य वातावरण मन प्रसन्न करते आणि भाविक या ठिकाणी सहकुटुंब ही प्रदक्षिणा पूर्ण करतात.
हेही वाचा