मुंबई Assembly elections : नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीनं जागा वाटपात आघाडी घेऊन प्रचारात मुसंडी मारली होती, ज्याचा त्यांना फायदा झाला. आता विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीत जागा वाटपाबाबत जोरदार चर्चा सुरू आहे. सर्वात आधी मुंबईतील 36 जागांबाबतची चर्चा जवळपास अंतिम होत आली आहे. या चर्चेअंती मुंबईमध्ये शिवसेनेचा वरचष्मा असल्याचं निश्चित होत आहे. मुंबईत लोकसभा मतदारसंघ निहाय शिवसेनेची ताकद आणि शिवसेनेकडे असलेले लोकसभेचे तीन मतदारसंघ पाहता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मुंबईच्या सहा लोकसभा मतदारसंघांमध्ये वीस विधानसभा जागा देण्याबाबत तीनही पक्षांचं जवळपास एकमत होत असल्याची माहिती शिवसेना खासदार अनिल देसाई यांनी दिली आहे. याबाबत अजूनही चर्चा सुरू आहे. मात्र शिवसेना मुंबईमध्ये अजूनही तळागाळात रुजलेली असून शिवसेना 20 जागांवर ठाम आहे असंही ते म्हणाले. शिवसेनेच्या फुटीनंतर मुंबईतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडे केवळ सहा आमदार आहेत. मात्र असं असलं तरी पक्षाची ताकद ही अजूनही तळागाळात निश्चितच आहे, असा दावाही देसाई यांनी केला.
कोणत्या मतदारसंघात लागणार शिवसेनेचा कस - शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा बालेकिल्ला मानला जाणाऱ्या दक्षिण मुंबईतील वरळी आणि शिवडी या दोन मतदारसंघांवर महायुतीनं विशेष लक्ष केंद्रित केलं आहे. या मतदारसंघांमध्ये आदित्य ठाकरे यांच्या विरोधात महायुती ताकदवान उमेदवार निश्चितच देणार आहे. दरम्यान, मनसेचे संदीप देशपांडे यांना उतरवण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्या पाठोपाठ शिवडी मतदारसंघ हा अजय चौधरी यांचा मतदारसंघ आहे. या मतदारसंघात बाळा नांदगावकर उतरण्याची शक्यता आहे. त्यामुळे या दोन्ही मतदारसंघांवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला जोर लावावा लागणार आहे. त्या पाठोपाठ शिवसेना भवन असलेल्या दादर-माहीम मतदारसंघांमध्ये सदा सरवणकर यांना टक्कर देण्यासाठी विशाखा राऊत यांचं नाव पुढे येत आहे. मातोश्री बंगला असलेल्या वांद्रे पूर्व मतदार संघ ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासाठी प्रतिष्ठेचा असणार आहे. या मतदारसंघात ठाकरे गटाकडून वरूण सरदेसाई यांच्या नावाचा विचार होतो आहे.
मुख्यमंत्री पदावरही दावा - शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करावा अशी सातत्याने मागणी होत आहे. या संदर्भात काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी आपल्याला निवडणुका जिंकणे महत्त्वाचे आहे, मुख्यमंत्री पदाच्या चर्चेत आता रस नाही असं सांगून या चर्चेवर पडदा टाकलाय. दुसरीकडे शरद पवार यांनीही आधी सत्ता मिळवणे हे उद्दिष्ट आहे, मुख्यमंत्रीपदाचा चेहरा विधिमंडळ पक्षातील आमदार ठरवतील असं स्पष्ट केलं आहे. त्यामुळे मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याबाबत आम्ही आग्रही आहोत आणि आपसूकच आमचा दावा फक्त उरतो, असंही ते म्हणाले.
मुंबईत आम्हाला सहा जागा हव्यात-ॲड. मातेले - राष्ट्रवादी काँग्रेस युवक अध्यक्ष ॲड. अमोल मातेले यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया देताना सांगितलं की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने लोकसभा निवडणुकीत ईशान्य मुंबई जागेवरचा आपला हक्क सोडून शिवसेनेला मदत केली आहे. आता लोकसभा निवडणुकीनंतर ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील घाटकोपर पश्चिम, घाटकोपर पूर्व, तसंच कुर्ला अनुशक्ती नगर आणि जोगेश्वरी या जागांवर आमचा दावा असून मुंबईत किमान आम्ही सहा जागा राष्ट्रवादी काँग्रेस म्हणून लढवणार आहोत. याबाबत आम्ही आग्रही असून मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याबाबत अद्याप कोणतीही चर्चा अंतिम झालेली नाही. आता फक्त निवडणुका जिंकणे एवढेच उद्दिष्ट राष्ट्रवादी काँग्रेसच्या समोर आहे. त्यामुळे याबाबतचा निर्णय वरिष्ठ पातळीवर यथावकाश घेतला जाईल असंही मातेले यांनी स्पष्ट केलं.
अद्याप कोणताही निर्णय अंतिम नाही-सावंत - मुंबईतील जागावाटप जवळपास निश्चित होत आलं आहे. मात्र, अद्याप अंतिम झालेलं नाही. मुंबईतील अनेक मतदारसंघांमध्ये काँग्रेसची अजूनही ताकद आहे. या मतदारसंघांवर आमचा दबदबा कायम आहे. त्यामुळे मुंबईत काँग्रेसलाही सन्मानपूर्वक जागा मिळाव्यात यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत आणि त्या मिळतील याबाबत आमची खात्री आहे. महाविकास आघाडीत मुख्यमंत्री पदावरून कोणतीही रस्सीखेच नाही. मुख्यमंत्री पदाबाबत निवडणुका झाल्यानंतर निर्णय घेतला जाणार आहे, त्यामुळे त्याची आताच चर्चा करणे योग्य नाही, असे सावंत यांनी स्पष्ट केलं.
एकूणच मुंबई, पूर्व उपनगर आणि पश्चिम उपनगर या तीनही भागांमध्ये असलेल्या एकूण 36 विधानसभेच्या जागांपैकी 20 जागा या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडे दहा जागांच्या आसपास काँग्रेसकडे आणि सहा जागा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडे जातील अशी चर्चा असून याला जवळपास अंतिम स्वरूप दिलं जाईल, असे महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या वक्तव्यावरून स्पष्ट होतं.
हेही वाचा..