ठाणे Akshay Shinde Encounter : ऑगस्ट महिन्यात बदलापुरातील एका शाळेत दोन चिमुकल्या मुलींवर अत्याचार केल्याची घटना समोर आली. या घटनेचे तीव्र पडसाद देशभर उमटले. 20 ऑगस्टला बदलापूर रेल्वे स्थानकात बदलापूरकरांनी मोठं आंदोलन करत दहा तास रेल्वे थांबून ठेवली. यावेळी आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांना गोळीबार करावा लागला. तर आरोपी अक्षय शिंदेला पोलीस कोठडी सुनावण्यात आली. दरम्यान, सोमवारी अक्षय शिंदेनं पोलिसांवर गोळीबार केला. पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ उलट अक्षयवर गोळीबार केला. यात अक्षयचा मृत्यू झाला. यानंतर बदलापुरात पीडित मुलीला न्याय मिळाला. म्हणून बदलापूरकरांनी तसेच शिवसेनेनं पेढे वाटून फटाके फोडत जल्लोष केला.
चिमुकलीला न्याय मिळाला : अक्षय शिंदेंच्या मृत्यूनंतर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत असताना बदलापूर रेल्वे स्थानक इथं आरोपीला फाशी द्या म्हणून आंदोलन करण्यात आलं. त्याच बदलापूर रेल्वे स्थानकात मंगळवारी शिवसेनेकडून जल्लोष करण्यात आला. यावेळी शिवसैनिकांनी आरोपीच्या विरोधात घोषणाबाजी केली तर राज्य सरकारचं अभिनंदन केलं. यावेळी हातात फलक धरत आणि पेढे वाटत आंदोलकांनी जल्लोष केला. दरम्यान "अरे मेला मेला नराधम मेला.. चिमुकलीला न्याय मिळाला, नराधमाला शिक्षा झालीच, शिंदे सरकारचं अभिनंदन, अशी घोषणाबाजी करत आंदोलकांनी परिसर दणाणून सोडला.
अक्षय शिंदे एन्काउंटरवरुन आरोप-प्रत्यारोप : एकीकडं नराधम अक्षय शिंदेचा एन्काऊंटर झाल्यानंतर समाजातून चिमुकलीला न्याय मिळाला, अशी भावना व्यक्त होत आहे. तर दुसरीकडं विरोधकांनी मात्र यावर टीका केली. यात मुख्य आरोपी वेगळाच आहे, मात्र अक्षय शिंदे जिवंत राहिला तर मुख्य आरोपी बाहेर येऊ शकतो. म्हणून अक्षय शिंदेचा एन्काऊंटर केला आहे, राज्यात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित नाही. त्यामुळे गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा..., अशी मागणी विरोधकांनी केली. हा एन्काऊंटर घडूवन आणला आहे, असा आरोप विरोधकांनी केला. त्यामुळे आरोपीचा मृत्यू झाल्यानंतर विरोधक मात्र राज्य सरकारवर आणि गृहखाते कसे अपयशी आहे, यावरून टीका करताना दिसत आहेत. ज्या दोन पोलिसांनी अक्षय शिंदेवर गोळीबार केला, त्यांचीही नार्को चाचणी व्हावी, अशीही मागणी विरोधकांनी केली आहे. त्यामुळे सध्या सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात या प्रकरणावरुन आरोप प्रत्यारोप होताना पाहायला मिळत आहेत.
हेही वाचा :